मुंबई : मुंबईच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढलेले तापमान व वाढत असलेली आर्द्रता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उन्हाचा असह्य त्रास मुंबईकरांना होत आहे. दरम्यान, रविवार, सोमवार आणि मंगळवारी सलग तीन दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाचा ताप, तसेच उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सकाळी वातावरणात जाणवणारा गारवा, त्यानंतर दुपारी होणारी लाही असा तापमानामधील विचित्र बदल मुंबईकर अनुभवत आहेत. वाढत्या तापमानाची ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सध्या पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान वाढले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तापमानातील कमालीचा चढउतार मुंबईकरांनी अनुभवला आहे. मात्र, नियमित उन्हाळा सुरू व्हायला आणखी काही दिवस लागतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

अरबी समुद्रातून येणारे वारे उष्णता आणि आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात आदळतात. त्यावेळी उष्णतेची जबरदस्त लाट मुंबईसह कोकणात इतर भागांपेक्षा अधिक जाणवते. त्या वेळी मुंबईकरांना अधिक उष्णतेचा, उष्माघाताचा, तसेच रात्री जाणवणारा उकाडा हा केवळ त्या दिवसाच्या कमाल तापमानावरच नाही, तर दुसऱ्या दिवशीच्या किमान तापमानावरही अवलंबून असतो. यामुळेच मुंबईकरांना तापमान कमी भासत असले तरी उकाडा खूप जाणवतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उष्णतेची लाट कधी येते

सामान्यत: सलग दोन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने अधिक असल्यास उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. मार्च ते मे या कालावधीत देशाच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता असते. सध्या पूर्वेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या भागात हवा अधिक तप्त होत आहे.