scorecardresearch

मुंबईत मुसळधार

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले.

मुंबईत मुसळधार
मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. सांताक्रूझ येथे सोमवारी मध्यरात्री २.३० वाजल्यापासून ते मंगळवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत तीन तासांत ७४.२ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत गुरुवारीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. शनिवारपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. मंगळवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर सकाळपर्यंत कायम राहिला. त्यानंतर पावसाचा वेग काहीसा कमी झाला. सायंकाळच्या सुमारास शहरात पावसाने विश्रांती घेतली. मात्र, उपनगरांत पावसाची रिपरिप सुरू होती.

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. आज साडेआठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये १२३.६ मिमी आणि कुलाब्यात ५५ मिमी पावसाची नोंद झाली.

वाहतुकीवर परिणाम

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईत हिंदमाता, किंग्ज सर्कल, शीव येथे रस्ते वाहतूक मंदावली होती. अंधेरी सब-वे येथील वाहतूक काही काळ बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मानखुर्द रेल्वे स्थानक पुलावरील दक्षिण वाहिनीवर वाहतूक मंदगतीने सुरू होती. खार सब-वे येथेही वाहतूक संथगतीने सुरू होती.

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात

प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) १२ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) दोन अशा एकूण १४ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. कांजूरमार्ग, घाटकोपर, पालघर, सातारा येथे प्रत्येकी एक आणि रायगड- महाड, ठाणे,  रत्नागिरी-चिपळूण आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी दोन अशी एनडीआरएफची एकूण १२ पथके तैनात आहेत. नांदेड आणि गडचिरोली  येथे प्रत्येकी एक अशी एकूण दोन एसडीआरएफ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यात १४ हजार नागरिक सुरक्षितस्थळी

राज्यात एक जूनपासून ९ ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१६ गावे प्रभावित झाली आहेत. राज्यात विविध ठिकाणी ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११९ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत, तर २३२ जनावरे दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, अशी माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain disrupts normal life in mumbai zws

ताज्या बातम्या