मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळपासून वाढला. रात्री आठ वाजेपर्यंत शहर भागात १२० मिमी पावसाची नोंद झाली. तर त्याखालोखाल पश्चिम उपनगरात ७८ आणि पूर्व उपनगरात ५८ मिमी पावसाची नोंद झाली.

या मोसमातील पहिल्याच मुसळधार म्हणाव्या अशा पावसाने मुंबईची वाहतूक विस्कळीत केली. अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन, काळाचौकी आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले आहे. शहर भागात चार ठिकाणी इमारती व घरांचा भाग पडण्याच्या आणि उपनगरात १० ठिकाणी झाडे, फांद्या पडण्याच्या दुर्घटना घडल्या. तर, शहर व उपनगरात ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.  मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. बेस्टचे अनेक बसमार्ग वळवण्यात आले.

शहर भागात मलबार हिल परिसरात सर्वात जास्त १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, ग्रँट रोड  ८७ मिमी, भायखळा, मुंबई सेंट्रल  ८२ मिमी, दादर ९५ मिमी, चंदनवाडी  ९८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे आहे.

पूर्व उपनगर  मुलुंड परिसरात ५८ मिमी, कुर्ला ५२ मिमी, घाटकोपर  ४६ मिमी, चेंबूर  ४३।मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम उपनगर  वांद्रे परिसरात ८२ मिमी, वर्सोवा  ६४ मिमी, अंधेरी ( पूर्व)  ६० मिमी, सांताक्रूझ ५८ मिमी आणि विलेपार्ले  ५७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. अद्यापही अनेक भागात पाऊस सुरू आहे. रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे.