मुंबई : गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई व आसपासच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही बसला आहे. पावसाच्या पाण्यामुळे मैदानात चिखल झाला असून लाकडाचे साहित्य भिजले आहे. परिणामी नवीन साहित्यासाठी धावपळ करून बुधवारी पावसाने उसंत घेताच मंडळांच्या मंडपात पुन्हा नव्या जोमाने कामास सुरुवात झाली आहे.
मुंबईतील विविध ठिकाणच्या मैदानांवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आणि विस्तीर्ण मैदानांवर निरनिराळ्या संकल्पनांवर आधारित देखावे व विविध मंदिरांच्या प्रतिकृती उभारल्या जातात. हे चित्र विशेषतः लालबाग – परळमधील मैदानांवर पाहायला मिळते. मात्र गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना सलग चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे देखाव्यांचे काम पुरते थांबले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे कारागीर पोहोचू शकले नाहीत. अनेक ठिकाणी मंडपांमध्ये पाणी शिरले. सततच्या जलधारांमुळे मैदानातील लाकडाचे साहित्य व खांब आणि रस्त्यावरील लाकडाचे प्रवेशद्वार व कमानी भिजल्या आहेत. तसेच देखाव्यांचे रंगकामही उडून गेले. मंडपावरील कापडी छत, आच्छादन, पडदे ओले झाले आहेत. परिणामी आता नवीन साहित्य गोळाकरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा कामाला लागले आहेत देखाव्याचे काम पुन्हा सुरू केले आहे. यामुळे मंडळांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला आहे. आता गणेशोत्सव सुरू होण्यास जेमतेम सहा दिवस राहिले आहेत. इतक्या कमी कालावधीत सर्व साहित्याची तजवीस करून काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान मंडळांसमोर आहे.
परळमधील नरेपार्क मैदानात परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची म्हणजेच ‘परळचा राजा’ची गणेशमूर्ती यंदा प्रभू श्रीरामाच्या रुपात आहे. त्या अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे. मात्र मुसळधार पावसामुळे नरेपार्क मैदानात प्रचंड चिखल झाला. त्यामुळे आता देखावा साकारताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच सततच्या जलधारांमुळे लाकडाचे साहित्य संपूर्णतः भिजले असून नवीन साहित्य वापरुन काम करण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीबद्दल परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिषेक परब यांनी सांगितले की, ‘मुसळधार पावसामुळे मैदानात चिखल झाला असून देखावा उभारणीत अडथळे येत आहेत.
सार्वजनिक वाहतुक व्यवस्था कोलमडल्यामुळे कारागीर पोहोचू शकले नाहीत. मैदानातील चिखलामुळे सामानाच्या गाड्या मैदानात येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दोन दिवस काम थांबले होते. पावसाच्या पाण्यामुळे लाकडाचे साहित्य भिजले आहे. त्यामुळे नवीन साहित्याचा वापर करून पुन्हा कामास सुरुवात झाली आहे आणि अयोध्येतील राम मंदिराचा देखावा वेळेत पूर्ण करू’.