मुंबई : मे आणि जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा झाली असून आजघडीला धरणांमध्ये ३८.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये अपघा ५.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय सुधारणा झाल्याने मुंबईकरांवरील पाणी संकट टळले आहे.

मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या सातही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. कडक उन्हाळ्यामुळे झपाट्याने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणीसाठा खालावू लागला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभाग चिंतीत झाला होता. परिणामी, राज्या सरकारच्या परवानगीने मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी धरणांतील राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागला होता.

यंदा अवकाळी पावसाने मे महिन्यात लावलेली हजेरी आणि त्यानंतर जूनमध्ये कोसळलेला मुसळधार पाऊस यामुळे सातही धरणांमधील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. सातही धरणांमध्ये २८ जून रोजी सकाळी ६ च्या सुमारास ३८.५८ टक्के म्हणजेच पाच लाख ५८ हजार ३५० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गतवर्षी याच दिवशी या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होती. त्यावेळी केवळ ५.३५ टक्के म्हणजे ७७ हजार ४२१ दशलक्ष लिटर इतके पाणी धरणांमध्ये होते. तर तत्पूर्वी २८ जून २०२३ रोजी धरणांमध्ये एक लाख पाच हजार १०८ दशलक्ष लिटर (७.२६ टक्के) पाणी उपलब्ध होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणांतील साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

गेल्या दोन महिन्यात उर्ध्व वैतरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४३६ मिमी, मोडकसागरमध्ये ८२३ मिमी, तानसामध्ये ८२८ मिमी, मध्य वैतरणामध्ये ८९३ मिमी, भातसामध्ये ७५० मिमी, विहारमध्ये ४१७ मिमी, तर तुळशीमध्ये ७४२ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांमध्ये विहार वगळता अन्य सहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठ्या हळूहळू वाढ होत आहे.

धरणांतील जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

२८ जून २०२५ – पाच लाख ५८ हजार ३५०

२८ जून २०२४ – ७७ हजार ४२१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ जून २०२३ – एक लाख पाच हजार १०८