मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे परळ येथील केईएम व डोंगरीमधील जे. जे. रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. केईएम रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर, तसेच काही रुग्ण कक्षांबाहेर पाणी साचले. तर जे.जे. रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर सकाळच्या सुमारास पाणी तुंबले होते.
मुंबईमध्ये सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबून दैना उडाली आहे. मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये अशी ओळख असलेल्या केईएम व जे.जे. रुग्णालयातही पाणी तुंबले. केईएम रुग्णालय व टाटा रुग्णालयामध्ये असलेल्या रस्त्यावर गुडघ्याहून जास्त पाणी तुंबले आहे. त्यामुळे केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागात जाणाऱ्या रुग्णांना पाण्यातून वाट काढावी लागली. त्याचबरोबर केईएम रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग व रुग्णकक्ष ४ अ या रुग्णकक्षांच्या वऱ्हांड्यामध्ये सकाळच्या सुमारास काही प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे या रुग्णकक्षामध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना काही काळ त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, वऱ्हांड्यात तुंबलेले पाणी तातडीने पाणी उपसा करणाऱ्या पंपांच्या साह्याने काढण्यात आले, त्यामुळे फार पाणी साचले नव्हते, असे केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाप्रमाणे जे.जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीबाहेरील परिसरामध्ये मोठ्या प्रमााणात पाणी साचले होते. त्यामुळे रुग्णांना बाह्यरुग्ण कक्षाच्या इमारतीमधून मुख्य इमारतीमध्ये ये-जा करताना पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्याचप्रमाणे एमआरआय, सीटीस्कॅन काढण्यासाठी जाणाऱ्या व त्यासाठी नोंदणी करणाऱ्या रुग्णांना पाण्यामध्ये उभे राहावे लागत होते. जे.जे रुग्णालयाच्या मुख्य इमारतीबाहेरील जे.जे. रुग्णालयातील रहिवासी इमारतींच्या परिसरामध्येही गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून रुग्णालयामध्ये जावे लागत आहे. जे. जे. रुग्णालयाबाहेर रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे जे.जे. पोलीस ठाणे परिसरात आणि जे.जे. रुग्णालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात पाणी साचले आहे. जे.जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदा पाणी तुंबले नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले.