मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. सखलभाग पाण्याखाली गेले आणि रस्त्यांवरील वाहतूक मंदावली, तर मध्य रेल्वेचे वेळापत्रक पार कोलमडले. त्याच वेळी पश्चिम रेल्वेवर लोकल धावत होत्या. गेल्या पाच वर्षांपासून केलेले नियोजन, वेळीच केलेली पावसाळीपूर्व कामे, अत्याधुनिक सुविधांचा वापर आणि नियंत्रण कक्षाच्या सूचना लक्षात घेऊन केलेली कामे आदींमुळे भर पावसातही पश्चिम रेल्वे खोळंबली नव्हती.
मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे मुंबईतील सखलभाग जलमय झाले आणि रस्ते वाहतूक मंदावली. तर, रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा काही काळ ठप्प झाली होती. परंतु, मुसळधार पाऊस कोसळतत असतानाही पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरू होती. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पावसाळ्यापूर्वी भुयारी गटाराची दुरूस्ती करण्यात आली. ३.५ किमीपेक्षा जास्त लांबीची भुयारी गटारे तयार करण्यात आली. १५ हून अधिक पूरप्रवण ठिकाणी सूक्ष्म-टनेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा निचरा करण्यास मदत केली. तसेच रेल्वे रूळावर पाणी साचू नये, म्हणून रेल्वे रूळांची उंची वाढविण्यात आले. यासह पश्चिम रेल्वेने भुयारी गटारे, नाले, कल्व्हर्टची सातत्याने स्वच्छता केली. चर्चगेट – विरार दरम्यानच्या संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी पावसाळी गस्त घालणाऱ्या पथकांना तैनात केले. रेल्वे रूळावर पाणी साचण्याच्या ठिकाणी पंपाची संख्या वाढविण्यात आली आणि योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा करण्यात आला. मुंबईतील इतर वाहतूक सेवा ठप्प झाली असताना प्रवाशांच्या सेवेसाठी पश्चिम रेल्वे सज्ज होती. मुसळधार पावसातही प्रवाशांना पश्चिम रेल्वे आधार बनली, असे माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
झाडांच्या फांद्या सोमवारी रेल्वे मार्गावर पडल्याने आणि त्यांचा ओव्हर हेड वायरशी संपर्क झाल्याच्या दोन घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय झाली. मात्र, या दोन घटना वगळता प्रवाशांना काही त्रास झाला नाही. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कर्मचाऱ्यांना झाडांच्या फांद्याची छाटणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.