मुंबई : राज्यभरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू असतानाच गत दोन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये १.५३ लाख हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. ऑगस्टमध्ये २९ जिल्ह्यांमध्ये सुमारे १४.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीचा सर्वच जिल्ह्यांना फटका बसत आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये नजरअंदाजे सात जिल्ह्यांत दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांना मोठा फटका बसला असून, तब्बल ६५,१०० हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ऊस, कांद्यासह भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर खालोखाल यवतमाळमध्ये ३९,९८२ हेक्टर, वाशिमध्ये ३८,५४१ हेक्टर, उस्मानाबादमध्ये ६,८७५ हेक्टर, अमरावतीत २,६७३ हेक्टर आणि वर्ध्यात ४२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस सुरूच असल्यामुळे जिल्ह्यानिहाय पीक नुकसानीत भरच पडत आहे. गत दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नुकसानीच्या आकडेवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक परिसरात वाफसा नसल्यामुळे कांद्याची लागवड रखडली आहे. तर नाशिकसह सोलापूर, पुणे. सांगली परिसरात सततच्या पावसामुळे द्राक्षबागांच्या पूर्व हंगामी फळ छाटण्याही रखडल्या आहेत.
कडधान्ये झाली मातीमोल
खरीप हंगामात राज्यात कडधान्यांची लागवड होते. प्रामुख्याने मूग, मटकी, चवळी, उदीड, कुळीथ आदी कडधान्ये साडेतीन महिन्यांत काढणीला येतात. राज्यात सध्या कडधान्ये काढणीला आली आहेत. पण, अतिवृष्टीमुळे कडधान्ये पाण्यात बुडाली आहे. काढणीला आलेली आणि शेंगा वाळलेली कडधान्ये पाण्यात भिजल्यामुळे कडधान्ये कुजण्याचा आणि दर्जा खालविण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भासह आणि सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात कडधान्य लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. पण, याच भागात दोन – तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शेतजमिनीत पाणी साचल्यामुळे पिके कुजू लागली आहेत.
पंचनामे करण्याच्या सूचना – कृषिमंत्री
चांगल्या पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगामात सरासरी इतका पेरा झाला आहे. उत्पादनांत चांगली वाढ अपेक्षित होती. पण, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हवामान बदलाचा मोठा फटका खरीप हंगामातील पिकांना बसत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.