मुंबई : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका प्राण्यांनाही बसला असून अतिवृष्टीमुळे जखमी झालेल्या ३० हून अधिक प्राण्यांचे प्राण वाचविण्यात प्राणिमित्रांना यश आले आहे. ‘रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर’ (रॉ) या संस्थेने दोन फ्लेमिंगो, पाच कबुतर, चार पोपट, दोन कावळे आणि एका कॉर्मोरंटला जीवदान दिले.
मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात सोमवारी मुसळधार पाऊस कोसळला. दिवसभर सुरू असलेल्या पावसाचा प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागला. पालघर येथे एक फ्लेमिंगो जखमी झाले होते. यासंबंधी माहिती मिळताच रॉच्या प्राणिमित्रांनी त्याला रॉ संस्थेत दाखल केले. जखमी फ्लेमिंगोचा पंख फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. फ्लेमिंगोचा अधिवास पाणथळ क्षेत्रात असतो आणि ते अनेकदा ठिकाण बदलतात. पंख फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याचे स्थलांतर थांबते, त्यामुळे अन्न आणि पाण्याचा अभाव निर्माण होतो. यामुळे या फ्लेमिंगोच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. इतर पक्ष्यांनाही अशाप्रकारे इजा झाली आहे. यापैकी कबुतर, कावळे तसेच पोपट यांच्यावर वैद्यकीय उपचार करून काही वेळातच त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळ्यात अनेक वेळा साप, पक्षी, कासव किंवा इतर वन्यप्राणी शहरात किंवा घरांच्या परिसरात दिसतात. काही वेळा हे प्राणी जखमी अवस्थेत असतात. अशा वेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अशा प्राण्यांची मदत करण्यासाठी त्वरित स्थानिक प्राणी संघटनांच्या मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विविध प्राणीमित्र संघटनांनी केले आहे.
प्राणी तज्ज्ञांच्या मते, मुसळधार पावसामुळे अनेक प्राणी आपले नैसर्गिक निवासस्थान सोडून मोकळ्या जागांमध्ये येतात. काही वेळा प्राणी जखमी, आजारी किंवा अडचणीत सापडतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्राणीमित्र संघटना कार्यरत आहेत. मदतीसाठी वनविभागाच्या १९२६ या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. याचबरोबर वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअरशी मोबाइल क्रमांक ७६६६६८०२०२, ९८६९७८०२०२, तसेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनशी मोबाइल क्रमांक ९७५७३२२९०१/०२/०३ वर संपर्क साधावा, असे आवाहन या संस्थांकडून करण्यात आले आहे.
जखमी प्राणी,पक्षी दिसल्यास काय करावे
शक्य तितक्या लवकर स्थानिक प्राणीमित्र किंवा वनविभागाच्या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. ठिकाण, प्राण्याची प्रजाती आणि स्थिती याची माहिती द्यावी.
जमाव टाळा, गोंगाट आणि कॅमेरा फ्लॅश टाळावा जेणेकरून प्राणी किंवा पक्षी गोंधळून जाणार नाही.
हेल्पलाईन किंवा वनविभागाला माहिती दिल्यानंतर एखादा स्वयंसेवक येईपर्यंत प्राण्याच्या सुरक्षिततेची देखरेख करावी.
शक्य असल्यास स्थानिक प्राणीमित्र संस्थांच्या संपर्कात राहा.