मुंबई : श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी मुंबई, ठाणे परिसरात जोरदार सरी बरसल्या. मुंबई शहर व उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ठाणे जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. उल्हास नदीच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई शहर व उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्याने हा मार्ग काही वेळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ११.४ मिमी तर, सांताक्रूझ येथे ७४.२ मिमी पावसाची नोंद झाली. शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने शुक्रवारी सकाळी पश्चिम बंगालजवळ किनारपट्टी ओलांडली. पुढील दोन दिवस ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेशकडे वाटचाल करताना कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात शनिवारी सर्वदूर पावसाबरोबरच मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग तसेच मुंबई, ठाणे या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारनंतर जोर कमी
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी पावसाचा जोर कमी होणार आहे. तर, सोमवारपासून कोकण, विदर्भातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात दमदार सरी
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ठाणे, डोंबिवली, कल्याण शहरात वाहतूक कोंडी झाली. ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावर पावसामुळे वाहतूक संथ सुरू होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका, साकेत परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे शहरात शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या कालावधीत ४६.३२ मीमी पावसाची नोंद झाली.
बारवी धरणात ८३ टक्के साठा उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. बदलापुरात उल्हास नदीकिनारी असलेला चौपाटी परिसर पाण्याखाली गेला. बदलापूर शहर आणि आसपासच्या परिसरातही पाऊस सुरू होता. बारवी धरणात दुपारपर्यंत ८३ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने बारवी नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला.