मुंबई : गेल्या ऑगस्ट २०२४ मध्ये अटक झाल्यापासून कारागृहात बंदिस्त असलेल्या याचिकाकर्त्या महिलेसह तिच्या गंभीर आजारी असलेल्या एक वर्षाच्या बाळाची तातडीने सुटका करा, असे आदेश उच्च न्यायालयाने भायखळा कारागृह प्रशासनाला दिले. बाळाची वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने हे आदेश दिले.

प्रकरणातील तथ्ये आणि याचिकाकर्तीवरील आरोपांचा विचार करता तिने केलेला गुन्हा जामीनपात्र आहे. याशिवाय, याचिकाकर्तीच्या मुलीची वैद्यकीय स्थिती गंभीर आहे. त्यामुळे, याचिकाकर्तीला जामीन मंजूर केला जात असल्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

याचिकाकर्तीच्या मुलीच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर कऱण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी तुरुंग अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार, नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळी तुरूंग अधीक्षकांनी याचिकाकर्तीच्या मुलीच्या वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. ही मुलगी एक वर्ष दोन महिन्यांची असून श्वसननलिकेच्या खालच्या भागातील संसर्गामुळे तिला जेजे रुग्णालयात दाखल केले होते. तर तिच्या श्वसननलिकेच्या वरच्या भागातही संसर्ग झाल्यामुळे तिला अशक्तपणाचा त्रास होत आहे. शिवाय, तिचे रक्त संक्रमण केल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले होते. मुलीचा वैद्यकीय अहवाल तसेच याचिकाकर्तीचा गुन्ह्यात कोणताही सहभाग असल्याचे पुराव्यांतून सकृतदर्शनी स्पष्ट झालेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्ती जामिनास पात्र असून तिच्यासह तिच्या आजारी असलेल्या एक वर्षाच्या मुलीची तातडीने सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले.

याचिकाकर्तीविरोधात तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता व गेल्या ऑगस्ट महिन्यात तिला अटक केली होती. तेव्हापासून ती मुलीसह कारागृहातच होती. परंतु, मुलीला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे जामिनावर सुटका करण्याच्या मागणीसाठी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाचे म्हणणे…

याचिककर्तीला तुर्भे पोलिसांनी खून आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या आरोपांतर्गत अटक केली होती. परंतु, याचिककर्तीचा खुनाच्या गुन्ह्यात सहभाग आढळलेला नाही. तिने केवळ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहआरोपीना मदत केली होती हे खुद्द पोलिसांनीही मान्य केले आहे. त्यामुळे, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाच आरोप तिच्यावर असून हा गुन्हा जामीनपात्र आहे. शिवाय, तिच्या मुलीची वैद्यकीय स्थिती गंभीर असल्याबाबत कारागृह प्रशासनाचे दुमत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्तीला जामीन मंजूर करत आहोत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले.