मुंबईमध्ये मंगळवारी करोनाचे ९३१ नवे रुग्ण आढळले असून रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. मात्र २४ तासांत ४९ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. मुंबईतील एकूण मृतांची संख्या सात हजारांच्या पुढे गेली असून त्यापैकी ५०३ मृत्यू हे अंधेरी, जोगेश्वरीच्या पूर्व भागातील आहेत.
दर दिवशी हजार दीड हजार रुग्णांची नोंद होणाऱ्या मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.७९ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर गेला आहे. मात्र मुंबईतील बोरिवली, नानाचौक—मलबार हिल, गिरगाव या भागांतील रुग्णसंख्या वाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त आहे.
मुंबईत आतापर्यंत सहा लाख ६३ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १९ टक्के व्यक्ती बाधित आढळले आहेत. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या १ लाख ३० हजारांवर गेली असून मंगळवारी ८९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एक लाख ५ हजार १९३ रुग्ण म्हणजेच ८० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १७,६९७ रुग्ण उपचार घेत असून सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण बोरिवली भागात आहेत.
मंगळवारी मृत झालेल्या ४९ रुग्णांपैकी ४० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ३१ पुरुष व १८ महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी तिघांचे वय ४० वर्षे होते. एकूण मृतांची संख्या ७,२१९ झाली आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू हे अंधेरी, जोगेश्वरीचा पूर्व भाग असलेल्या के-पूर्व विभागातले असून येथील मृतांची संख्या ५०३ वर गेली आहे.
राज्यात २४ तासांत ४२२ जणांचा मृत्यू
मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात ४२२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. ११,११९ नवे रुग्ण याच काळात आढळले. राज्यातील मृतांची संख्या २०,६८७ झाली आहे. दिवसभरात रायगड जिल्ह्यात ६१, पुणे जिल्ह्यात ८९, नागपूर जिल्ह्यात ३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात १ लाख ५५ हजार रुग्ण उपचाराधीन असून, सर्वाधिक ३९,९७१ रुग्ण पुणे जिल्ह्य़ात आहेत. दिवसभरात पुणे शहर १२६७, पिंपरी-चिंचवड ७४७, नाशिक ५११, कोल्हापूर ४७१, तर नागपूरमध्ये ६५६ नवे रुग्ण आढळले.