मुंबई : मुंबईत दिवाळीच्या कंदिलांपेक्षा अधिक जाहिरात फलक लागले आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देणारे, छट पूजेच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांनी शहर व्यापले आहे. त्यातच सोमवारी केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी अक्षऱशः जागा मिळेल तेथे जाहिरात फलक उभे करण्यात आले आहेत. महायुतीच्या नेत्यांनी अमित शाह यांच्याप्रती आपली निष्ठा दाखवण्यासाठी मिळेल तिथे जाहिरात फलक लावले आहेत. अगदी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या परिसरातही या जाहिराती वाट्टेल तशा डकवण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालयाने जाहिरात फलकांवरून कितीही फटकारले तरी मुंबईत सण उत्सवांच्या काळात अनधिकृत जाहिरातींचे अक्षरशः पेव फुटलेले असते. त्यात राजकीय फलकांची संख्याच अधिक असते. सणाच्या काळात रस्त्याच्या कडेला धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक जाहिरात फलकांची गर्दी होते. गणेशोत्सवाच्या काळात लागलेल्या जाहिराती काढल्या नाहीत तोच नवरात्राच्या जाहिराती आणि त्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या राजकीय नेत्यांच्या जाहिराती ठिकठिकाणी दिसत आहेत. दिवाळी पाठोपाठ छटपूजेच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातींचीही त्यात भर पडली आहे. हे सारे संपत नाही तोच मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर जाहिराती लागलेल्या दिसत आहेत. मुंबईत, विशेषतः दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर हे जाहिरात फलक लागले आहेत. रस्त्याच्या कडेला, विजेच्या खांबावर फलक लागलेले आहेत. सागरी किनारा मार्ग, मरीन ड्राईव्ह, इतकेच काय पण मुंबई महापालिका मुख्यालयाच्या परिसरातील रस्तेही अमित शाह यांच्या स्वागतासाठीच्या जाहिरात फलकांनी रंगले आहेत.

दरम्यान, हे सर्व जाहिरात फलक अधिकृत आहेत की अनधिकृत याबाबत मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाशी संपर्क साधला असता एकाही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.

शिवसेना (शिंदे) पक्षाचे सर्वाधिक फलक

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकांमध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जेवढे फलक लावले त्यापेक्षा जास्त फलक हे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे लावण्यात आले आहेत. महापालिका मुख्यालय परिसरातही शिवसेना (शिंदे) पक्षाने जाहिरात फलक लावले आहेत. तर मलबार हिल परिसरातही रिज रोड, वाळकेश्वर परिसरातही मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक लावले आहेत.