बुटात सोने दडवून आणणाऱ्या हॉटेल व्यावसायिकासही अटक
गौतम बुद्धांच्या मूर्तीत दडवून सोने आणणाऱ्या मुंबईच्या बांधकाम कंत्राटदाराला इवाई गुप्तचर विभागाने (एआययू) अटक केली. दीपेश काशियाती (३३) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे एक किलो सोने हस्तगत करण्यात आले. दरम्यान, एआययूने शाहिद इक्बाल नावाच्या हॉटेल व्यावसायिकाला अटक करून त्याच्याकडूनही सुमारे एक किलो सोने हस्तगत केले. शाहिदने बुटात दडवून सोने आणले होते.
एआययूने दिलेल्या माहितीनुसार दीपेश रविवारी मध्यरात्री बँकॉकहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. सोबत आणलेल्या सामानात एआययू अधिकाऱ्यांना गौतम बुद्धांची मूर्ती आढळली. मूर्ती वजनदार असल्याने एआययू अधिकाऱ्यांचा संशय बळावला. दीपेशकडे कसून चौकशी करण्यात आली. अखेर त्याने मूर्तीत एक किलो वजनाचे २४ कॅरेट सोन्याचे तुकडे दडविल्याची कबुली दिली. बँकॉक विमानतळावर विमान पकडण्याआधी एका तरुणाने ही मूर्ती हाती दिली.
ती मुंबई विमानतळाबाहेर एका व्यक्तीला देण्याची विनंती केली, असे दीपेशने चौकशीत सांगितले. दीपेशने आणलेल्या मूर्तीतून सोने हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत ३० लाख असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कोलकाताहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या स्पाइस जेटच्या विमानातून हॉटेल व्यावसायिक शाहिद प्रवास करीत होता. त्याच्या बुटांमधून सुमारे एक किलो सोने हस्तगत करण्यात आले. चौकशीदरम्यान हे सोने अन्य प्रवाशाने स्पाइस जेट विमानातील आसनाखाली दडवून कोलकात्यापर्यंत आणले. कोलकात्याहून हे विमान मुंबईला येणार होते. शाहिदने कोलकात्याहून प्रवास सुरू केला. त्याने हे सोने आपल्या बुटांमध्ये दडवले, अशी माहिती पुढे आली आहे. या दोन्ही आरोपींकडे एआययू अधिकारी कसून चौकशी करीत आहेत.