मुंबई : १६ दिवसांपूर्वी कामावर रुजू झालेल्या गृहसेविकेने घरातील अडीच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिध्द पंजाबी संगितकार जग्गी संधू यांच्या व्यवस्थापकाच्या घरात ही चोरी झाली. विशेष म्हणजे त्यांनी या गृहसेविकेला कामावर ठेवताना कुठलेही तपशील घेतलेले नव्हते.
सुयश निमा हे अंधेरीच्या लोखंडवाल संकुलातील पॅराडाईज सोसायटीत राहतात. ते पंजाबी संगीतकार जग्गी संधू यांचे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी १६ मे रोजी आपल्या घरातील काम करण्यासाठी राणी नावाच्या गृहसेविकेची नियुक्ती केली होती. राणी दुपारी १ ते ३ या वेळेत घरकाम करण्यासाठी येत होती. सुयश यांची पत्नी रक्षा हिने बुधवारी एका समारंभाला जाण्यासाठी दागिने घालणार होती. तिने कपाट उघडले असता सोन्याचे दागिने गायब झाल्याचे दिसले. घरात सर्वत्र शोध घेतल्यानंतर दागिने सापडले नाहीत. घरातील कपाटात सोमवार २६ मे रोजी त्यांनी दागिने पाहिले होते. या कालावधीत त्यांच्या घरात कुणीही बाहेरील व्यक्ती आली नव्हती. त्यामुळे गृहसेविका राणी हिनेच चोरी केल्याची त्यांची खात्री पटली. सुयश यांच्या पत्नीचे २ सोन्याच्या बांगड्या (१६ ग्रॅम), २ सोन्याची अंगठ्या (७ ग्रॅम) आणि एक रोझगोल्डचा ८ ग्रॅम वजानाचा हार चोरीला गेला होता.
याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गृहसेविका राणीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामावर रूजू होताच १६ दिवसात तिने चोरी केल्याचे सुयश यांनी तक्रारीत म्हटले आहे. गृहसेविका राणी हिचे पूर्ण नाव, तसेच इतर तपशीलही त्यांनी घेतला नव्हता. घरात काम करणाऱ्या नोकरांकडून चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. गरज म्हणून नोकरांना कामावर ठेवले जाते. मात्र त्यांच्याकडूनच गुन्ह्याचे प्रमाण घडत असते. घरात नोकर ठेवताना त्याची पूर्ण माहिती घ्यावी, खातरजमा करावी आणि त्याचे तपशील सोसायटीत जमा करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.