मुंबई : मूल्य निर्मिती, संपत्ती निर्मिती, सामाजिक दायित्व, संस्कृती संवर्धन या निकषांच्या आधारे विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या भारतातील प्रभावशाली महिलांची यादी हुरन संशोधन संस्थेतर्फे कैनडियरच्या सहकार्याने जाहीर करण्यात आली आहे. एकूण ९७ महिलांचा त्यात समावेश आहे.
व्यावसायिक महिलांच्या यादीत शांती एकंबरम – कोटक महिंद्रा बँक (६२) या प्रथम स्थानी आहेत. त्यानंतर पहिल्या पिढीतील संपत्ती निर्मात्यांच्या यादीत राधा वेंबू – झोहो कॉर्पोरेशन (५२), पुढच्या पिढीतील नेतृत्वाच्या यादीत रोशनी नाडर मल्होत्रा – एचसीएल टेक्नॉलॉजीस (४३), गुंतवणूकदारांच्या यादीत श्वेता जालन – अद्वैत इंटरनॅशनल (४८), सामाजिक दायित्व या गटात रोहिणी निलकेणी – रोहिणी निलकेणी फिलॉन्थ्रोपीज (६५), तरुण महिला नेतृत्वाच्या यादीत देवांशी केजरीवाल – स्किलमॅटिक्स (२८), महिला कलाकारांच्या यादीत अर्पिता सिंग (८७), अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा समावेश आहे. तसेच मृचा ब्युटीची २६ वर्षीय मृणाल पांचाळ सर्वात कमी वयाची आणि ८७ वर्षांच्या कलाकार अर्पिता सिंग या यादीतीस सर्वात ज्येष्ठ महिला आहेत.
‘कैनडियर हुरन इंडिया वुमन लीडर्स लिस्ट २०२५’च्या ९७ महिलांच्या अंतिम यादीत उद्योगक्षेत्रातील आर्थिक सेवा क्षेत्रातून २३, ग्राहकोपयोगी वस्तू सेवा क्षेत्रातून १८, आरोग्यसेवा क्षेत्रातून १४, अन्न आणि पेये क्षेत्रातून ९, माध्यम व मनोरंजन क्षेत्रातून ८ आणि शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रातून ८ महिलांचा समावेश आहे. भारतातील विविध शहरानुसार मुंबईतून सर्वाधिक ३८, दिल्लीतून १२, बंगळुरूतून १० आणि पुणे, चैन्नई, कोलकत्ता, अहमदाबाद शहरातून प्रत्येकी ३ महिलांचा समावेश आहे.
‘भारतीय महिला भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाला चालना देत आहेत, असे मत हुरून इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी यावेळी व्यक्त केले.