मुंबई: ओशिवरा पोलिसांनी जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून २१ कोटी रुपयांचा हायड्रो गांजा जप्त केला. या प्रकरणी इंडोनेशियातील दोन नागरिकांना अटक करण्यात आली.

जोगेश्वरीमधील एका हॉटेलमध्ये दोन परदेशी नागरिक अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती ओशिवरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कदम यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी हॉटेल अलिबाबामध्ये छापा टाकला. हॉटेलमध्ये असलेल्या इंडोनेशियातील दोन नागरिकांकडे २१ किलो ५२२ ग्रॅम हायड्रो गांजा सापडला. या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २१ कोटी ५५ लाख आहे. या प्रकरणी इंडोनेशियातील नागरिक बुडी वीयाने (४४) आणि रहमद हिदायत (३९) यांना अटक करण्यात आली.