मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलावर्गाला खूश करण्यावर भर देणाऱ्या महायुती सरकारने यापूर्वी दोनदा डावललेल्या सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला असून त्यामुळे आता प्रशासन आणि पोलीस दलात महिलाराज प्रस्थापित झाले आहे. सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश काढल्यानंतर रविवारी सायंकाळी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. जून २०२५ पर्यंत म्हणजे बरोबर एक वर्षाचा कालावधी सौनिक यांना मिळणार आहे. १९८७च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या सुजाता सौनिक या सर्वांत ज्येष्ठ अधिकारी आहेत.

हेही वाचा >>> शेतकऱ्यांना मोफत वीज; महावितरणलाच दिलासा

एप्रिल २०२३मध्ये त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती अपेक्षित होती. मात्र तेव्हा त्यांच्याच तुकडीतील पण त्यांच्यापेक्षा तुकडीत खालच्या क्रमांकावर असलेले त्यांचे पती मनोज सौनिक यांची वर्णी लागली. त्यांच्या निवृत्तीनंतर १ जानेवारीला नितीन करीर यांना संधी मिळाली. अखेर सुजाता सौनिक यांच्या ज्येष्ठतेचा सरकारने आदर केला. त्यामुळे आता पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला तर प्रशासनाच्या प्रमुखपदी सौनिक अशा दोन्ही महिला अधिकारी सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील दोघांना मुख्यसचिवपदी संधी मिळण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. मुख्य सचिवपदावरून सेवानिवृत्त झालेले नितीन करीर यांची लवकरच ‘महारेरा’च्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी, महिला तसेच समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य असेल. प्रशासनाची प्रमुख या नात्याने जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन. यासाठी सहकारी आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. सुजाता सौनिक, मुख्य सचिव