मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्थान, मुंबईने (आयआयटी मुंबई) जगातील सर्वाधिक क्षमतेच्या दुर्बिणी आणि उपग्रह उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘दक्ष’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णविवरांतून निघणाऱ्या गॅमा किरणांचा सखोल अभ्यास करण्यासाठी या दुर्बिणी तयार करण्यात येणार आहे. या संशोधनामुळे विश्वाच्या उत्क्रांतीविषयीचे नवे पैलू उघडण्यास मदत होणार आहे.

कृष्णविवर हे विश्वातील सर्वाधिक गूढ रहस्य मानले जाते. त्यातून निघणाऱ्या गॅमा किरणांचा मागोवा घेतल्यास विश्वाची उत्पत्ती, त्यातील ऊर्जा वितरण आणि आकाशातील उत्क्रांतीची प्रक्रिया याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रहस्याचा मागोवा घेण्यासाठी आयआयटी मुंबईने ‘दक्ष’ प्रकल्पाच्या माध्यमातून उच्च क्षमतेचे निरिक्षण करणाऱ्या दुर्बीणी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये आयआयटी मुंबईसह रामन संशोधन संस्था, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स (आयुका) या संस्थांचा सहभाग असणार आहे. या संस्था एकत्र येऊन तयार करणारी ही दुर्बीण अमेरिकेच्या फर्मी गॅमा रे दुर्बीणीपेक्षाही अनेक पटींनी कार्यक्षम असेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

आयआयटी मुंबईमधील ‘स्पेस टेक्नॉलॉजी अँड रिसर्च लॅब’ (स्टार लॅब) या केंद्रामार्फत उपकरणांची निर्मिती, डिझाईन, माहिती विश्लेषण अशा प्रत्येक टप्प्यावर काम करण्यात येत असून, यामध्ये विद्यार्थ्यांनाही काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून भविष्यामध्ये देशात अंतराळ संशोधनामध्ये नवी पिढी तयार होण्यास मदत होणार आहे. इस्रोने २०१८ सालीच या प्रकल्पाचा प्रस्ताव स्वीकारला होता. माजी आयुका संचालक प्रा. अजित केम्ब्हावी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रकल्पाला वैज्ञानिकदृष्ट्या परिणामकारक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम ठरवले होते. मात्र अजूनही या प्रकल्पाला संपूर्ण आर्थिक मंजुरी मिळालेली नाही.

सध्या प्राथमिक निधी उपलब्ध झाला असून लवकरच शासनस्तरावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती संशोधकांनी दिली. ‘दक्ष’ हे मिशन यशस्वीरीत्या पार पडल्यास भारत अवकाश संशोधनात जागतिक पातळीवर नवे शिखर गाठेल. कृष्णविवरांचे गूढ उलगडणे आणि गॅमा किरणांचा मागोवा घेणे ही आजवरची सर्वात आव्हानात्मक मोहीम मानली जाते. अशा वेळी आयआयटी मुंबई आणि देशातील सर्वोच्च संस्था खांद्याला खांदा लावून कार्यरत असल्याने ‘दक्ष’ हा प्रकल्प अवकाश संशोधनामध्ये भारताच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा ठरेल.