मुंबईः पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत सर्वत्र सतर्कता बाळगली जात असताना गोवंडी परिसरातून बेकायदा सीमकार्ड विक्री करणाऱ्या २३ वर्षीय तरूणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी ग्राहकाच्या नावावर एकापेक्षा अधिक सीमकार्ड घेऊन ते अडीच हजार रुपयांना विकायचा. या सीमकार्डचा वापर गुन्ह्यांमध्ये अथवा बेकायदा कृत्य करण्यासाठी केला जात असल्याचा संशय असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला सापळा रचून पकडले
समीर मेहबूब खान (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवंडी शिवाजी नगर परिसरात एक मोबाईल सीमकार्ड विक्रेता बेकायदा सीमकार्डची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-६च्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीद्वारे पोलिसांनी आरोपीवर छापा टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तोतया ग्राहक तयार करण्यात आले. पंचांसमक्ष नोंद केलेल्या पाचशे रुपयांच्या पाच नोटा त्यांना देऊन सोमवारी रात्री आरोपीच्या दुकानात पाठवण्यात आले. त्यावेळी बैगणवाडी येथील आरोपीला दुकानाजवळ या तोतया ग्राहकांना सोडण्यात आले. त्यांनी कागदपत्रांशिवाय सीमकार्डची मागणी केली. त्यावेळी आरोपीने त्यांच्याकडे अडीच हजार रुपये मागितले. तोतया ग्राहकांनी पोलिसांनी दिलेले अडीच हजार आरोपीला दिले. त्यानंतर तेथे काही अंतरावर उभ्या पोलिसांना इशारा केला. त्यावेळी पोलीस पथकाने समीरच्या दुकानावर छापा टाकून त्याला बेकायदा सीमकार्ड विकताना पकडले.
आरोपीकडून ७५ बेकायदा सीमकार्ड जप्त
आरोपीकडून ७५ बेकायदा सीमकार्ड, मोबाईल कंपन्यांची दोन ओळखपत्रे, फिंगरप्रींट स्कॅनर, दोन मोबाईल संच, एक बॅग व तोतया ग्राहकांनी दिलेले अडीच हजार रुपये पोलिसांनी या कारवाईत जप्त केले. यावेळी आरोपीची चौकशी केली असता त्याने बेकायदा सीमकार्ड विकत असल्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
असे मिळवायचा बेकायदा सीमकार्ड
आरोपीच्या चौकशीत बेकायदा सीमकार्ड मिळवण्याची कार्यपद्धतीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी त्यांच्याकडे सीमकार्ड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांच्या अधिक प्रत घ्यायचा. तसेच मोबाईल अॅपवरील स्कॅनरद्वारे ग्राहकांच्या डोळ्यांचे बुबुळांचे स्कॅन करायचा. त्यानंतर त्या ग्राहकाच्या नावावर एकापेक्षा अधिक सीमकार्ड मागवले जायचे. त्यातील केवळ एकच सीमकार्ड या ग्राहकाला देऊन आरोपी उरलेले सीमकार्ड बेकायदेशिररित्या चढ्या भावात म्हणजे अडीच हजार रुपयांना विकायचा. त्या सीमकार्डचा वापर बेकायदा कृत्यांसाठी केला गेल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.