मुंबई : चित्रनगरी परिसरात जेसीबीच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर झाडांची बेकायदेशीर तोड सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आदिवासी स्थानिकांना रोखण्यासाठी खासगी पुरुष व महिला बाउन्सर नेमण्यात आले आहेत, असा आरोप पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिकांनी केला आहे.
गोरेगाव पूर्व येथील चित्रनगरी परिसरातील काही भागात ६ जूनपासून जमीन साफ करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तेथील झाडे तोडण्यास सुरुवात केली. संबंधित परिसर हा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांतर्गत येतो. अशा क्षेत्रांमध्ये कोणतेही बांधकाम, खोदकाम किंवा झाडांची तोड कायद्याच्या परवानगीशिवाय करता येत नाही. मात्र, तरीदेखील बिनधास्तपणे जेसीबी मशीनद्वारे झाडे तोडली जात असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. आमच्या पूर्वजांनी जपलेलं हे जंगल आणि झाडं हेच आमचं आयुष्य आहे. आता या सर्वावर अतिक्रमण होतंय आणि आम्हांला विरोध करु दिलं जात नाही, असे एक आदिवासी महिला कार्यकर्त्या म्हणाल्या. दरम्यान, येथील स्थानिक आदिवासींनी याला विरोध केला असता स्थानिकांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर आदिवासींनी पोलीसांना याप्रकरणी तक्रार केली. मात्र, तेथे पोलीस आलेच नाहीत. या भागात अजूनही तेथील स्थानिक आदिवासी शेती करतात.
आदिवासी कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या शेती केलेली जमीन जबरदस्तीने हिसकावून घेतली जात असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. याचबरोबर वृक्षतोड तसेच जमीन साफ केल्यानंतरचे दगड आणि माती जवळच्या नदीत टाकण्यात येत आहे, ज्यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही येथील परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली आहे. आता पुन्हा सुरुवात झाली असून येथे इमारत किंवा इतर कशाचे तरी बांधकाम होत असल्याचा संशय स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.
काम बंद करण्याची नोटीस रॉयल सिने एशिया फिल्म्स या कंपनीला चित्रनगरी महामंडळाने सलतनत व्हॅली येथील जागा चित्रिकरणासाठी दिलेली आहे. मात्र, कंपनीने कोणतीही परवानगी न घेता तेथील जमीन सपाट केली आहे. त्याचबरोबर येथील अनेक झाडे देखील तोडली आहेत. त्यामुळे पालिकेने कंपनीला काम तात्काळ थांबविण्याची नोटीस बजावली होती. तरीदेखील हे काम सुरू आहे. शनिवारी देखील या भागातील झाडे तोडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.