मुंबई : मागील दोन – तीन दिवसांपासून विदर्भात दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार विदर्भ , मराठवाडा भागात शनिवारी विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. तर उर्वरित भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मागील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान, दक्षिण झारखंड आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, देवमाली, हमीरपूर दाल्तोंगज, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश, ते झारखंडपर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात १७ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. त्यानंतरच्या आठवड्यात (१८ ते २४ जुलै) विदर्भाचा काही भाग वगळता इतर ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. याचबरोबर तिसऱ्या आठवड्यात (२५ ते ३१ जुलै) विदर्भ, मराठवाडा वगळता इतर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यानंतर चौथ्या आठवड्यात (१ ते ७ ऑगस्ट) दक्षिण मराठवाडा सोडून इतर ठिकाणी कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे; विजांसह पावसाचा अंदाज
जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.