मुंबई : मुंबई तसेच उपनगरांत तापमान घटले असले तरी हवेतील आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव कायम आहे. दरम्यान, रविवार आणि सोमवार मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच या कालावधीत तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहीस असा अंदाज देखील वर्तविला आहे.

हेही वाचा >>> जिवंत बाळ जन्माला येऊ नये अशा पद्धतीने गर्भपात करण्यास परवानगी, बाळात दोष आढळल्याने याचिकाकर्तीची मागणी

मुंबईकरांना गेले काही दिवस उष्ण व दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. उन्हाचा ताप कमी झाला असला तरी उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३२.४ अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ केंद्रात ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत रविवार आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार हे तिन्ही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईत उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी काही भागात झळा कायम आहेत. राज्यातील सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद गुरुवारी जळगाव येथे झाली. याशिवाय मालेगाव(४२), बीड(४१.१), उस्मानाबाद(४१), सोलापूर(४१.१) येथे पारा चाळीस अंशापार गेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.