मुंबई: मुंबईसह ठाणे, नवी मुंबई भागात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली.  सकाळी सुरू झालेला पाऊस अजूनही संततधार पडत आहे. दरम्यान, पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबई,नवी मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मुंबईत मोसमी वारे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे सध्या सुरु असणारा पाऊस हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच गेल्या २४ तासांत नैऋत्य मोसमी वारे सक्रीय झाले असून त्यामुळे दक्षिण कोकण भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.

हेही वाचा >>> मुंबई: जुहू बीचजवळ समुद्रात बुडणाऱ्या दोघांना पोलिसानं वाचवलं, बचावकार्याचा VIDEO आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय झाल्याची माहिती  हवामान विभागाने दिली आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळपासूनही मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली . अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच नवी मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे.दरम्यान, पुढील ४८ तासांत मोसमी वारे मुंबईत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.