मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यभरात रविवारी आणि सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. दरम्यान, मुंबईसह ठाणे पालघर भागात आजही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा आहे.
मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात हजेरी लावली आहे. मुंबईसह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर होता. राज्यात पावसाचा जोर चांगलाच होता.
अनेक भागात सोमवारी अतिवृष्टीची नोंद देखील झाली आहे. दरम्यान, राज्यात अनेक भागात आजही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. आजही मुंबईसह ठाणे, पालघर भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे
मेघगर्जनेसह पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर , रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक , सोलापूर, सांगली, सातारा, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा.
अतिमुसळधार पाऊस,
रायगड, पुणे , १६६ मंडळात अतिवृष्टी
राज्याच्या १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात सोमवारी अतिवृष्टी झाली. रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, बीड जिल्हयांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. खडकवासल्याबरोबरच इतर काही धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. रायगडमधील अलिबाग, चरी, चौल, नागाव, पनवेल तालुक्यांतील पोयंजे, खालापूरमधील चौक, वसांबे, पेण तालुक्यामधील वाशी, महाड तालुक्यातील महाड, बिरवाडी, कारंजवाडी, नाटे, खारवली, तुडील, मांघरुण, माणगाव तालुक्यांतील माणगाव, इंदापूर, गोरेगाव, लोणेरे, निझामपूर या मंडळात अतिवृष्टी झाली. याचबरोबर सोलापूर, बीड जिल्ह्यांतील काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली.
उजनी, वीर धरणातून मोठा विसर्ग
भीमा आणि नीरा खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.उजनी धरण १०० टक्के भरले असल्याने धरणातून १ लाख क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. तसेच वीर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसामुळे उड्डाणांना फटका
पावसामुळे सोमवारी पुण्याहून नागपूरकडे जाणारे विमान उड्डाण रद्द करण्यात आले, तर नागपूरहून मुंबई आणि दिल्लीकडे जाणारी विमाने एक तास उशिराने रवाना झाली. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळावरील उड्डाण सेवा विस्कळीत झाली. याचबरोबर मुंबई विमानतळावर दृश्यमानता कमी झाल्याने अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांना विलंब झाला. काही विमानांना दिल्ली वा इतर पर्यायी विमानतळांवर वळवण्यात आले होते.
पावसाचा परतीचा प्रवास
पश्चिम राजस्थानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. त्यानंतर सोमवारी गंगानगर, नागौर, जोधपूर, बारमेरपर्यंत मोसमी वाऱ्यांच्या परतीची सीमा कायम होती. राजस्थानच्या आणखी काही भागासह, गुजरात, पंजाबच्या काही भागातून आज मोसमी वारे माघार घेण्याची शक्यता आहे.