मुंबई: मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पाठवल्या आहेत.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नऊ लहान मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर शेजारच्या राजस्थानमध्येही तीन मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मुलांना दिलेल्या कफ सिरपमुळेच दुष्परिणाम झाले असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील बालरुग्णालयात गेल्या काही दिवसांत झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर या निर्देशांना अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.
खोकल्याच्या सिरपमुळे काही मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातून घेतलेल्या सिरपच्या नमुन्यांमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल’ किंवा ‘इथिलीन ग्लायकॉल’ हे मूत्रपिंडाला गंभीर हानी पोहोचवणारे रसायन नाही, असे स्पष्ट करण्यात आले.आरोग्य विभागाचे संयुक्त संचालक डॉ. संजय मिश्रा यांनी सांगितले की, जबलपूरमधील एका वितरकाकडील संशयित सिरपचा साठा आधीच सील करण्यात आला आहे.राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएमआर आणि राज्य पथकांनी तपासलेल्या १९ पैकी ९ नमुन्यांत दूषित घटकांचे कोणतेही अंश आढळले नाहीत. उर्वरित १० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यातील दोन औषधांची चिंदवाडा जिल्ह्यातील विक्री आधीच थांबवण्यात आली आहे. अंतिम निष्कर्षासाठी अधिकृत फॉरेन्सिक व रासायनिक विश्लेषण सुरू आहे.
ऑगस्टच्या अखेरीस पाऱसिया व परिसरात या घटना प्रथम नोंदवल्या गेल्या. पाच वर्षांखालील बालकांना खोकल्याच्या सिरपसोबत नियमित औषधे देण्यात आली होती. सुरुवातीला सौम्य ताप व सर्दी अशी लक्षणे असलेली मुले काही दिवसांतच मूत्राचे प्रमाण कमी होणे व मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंतींना बळी पडली. दरम्यान, राजस्थानमध्ये गेल्या आठवड्यात खोकल्याच्या सिरप घेतल्यानंतर तीन मुलांचे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्य सरकारच्या मोफत औषध योजनेत वितरित करण्यात आलेल्या या डेक्स्ट्रोमेथॉर्फन आधारित सिरपशी मृत्यूंचा संबंध नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला असून, तरीही तपास पूर्ण होईपर्यंत या सिरपचे वितरण व विक्री स्थगित करण्यात आली आहे.
सिकर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. भरतपूर जिल्ह्यातही अशाच लक्षणांची तक्रार किमान पाच मुलांमध्ये आढळून आली आहे. उलट्या, झोप येणे, अस्वस्थता, चक्कर येणे, श्वास घेण्यात त्रास व बेशुद्धावस्था अशी लक्षणे त्यांच्यात दिसून आली.भरतपूरच्या वेईर तालुक्यात दोन-सव्वा दोन वर्षांच्या मुलाचा २७ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्याला ‘अॅमॉड्रॉक्स-डी’ खोकल्याचे सिरप देण्यात आले होते. मात्र जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की त्या मुलाला आधीपासूनच फेब्राइल झटके (उच्च तापामुळे होणारे आकडीचे प्रकार) येत होते.तसेच बांसवाडा जिल्ह्यात १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान खोकल्याच्या सिरपनंतर काही बालकांना त्रास झाल्याचे कळते. त्यातील चार मुलांना घरी सोडण्यात आले असून एक मुलगा अद्याप उपचार घेत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.सध्या बालकांना ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणांवर कफ सिरपऐवजी इतर उपचारपद्धतींचा अवलंब करावा, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ संदीप केळकर यांनी सांगितले की, सर्दी आणि खोकल्याच्या औषधांचा वापर ६ वर्षांखालील मुलांसाठी सूचित केलेला नाही. तुमच्या मुलाला सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांमध्ये त्रास वाढल्यास योग्य उपचारांसाठी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. १२ वर्षांखालील सर्व मुलांसाठी कोडीनचा वापर करणे निषिद्ध आहे. सर्दी आणि खोकल्याच्या औषधांच्या लेबलचे बारकाईने वाचन करा, तसेच औषधांचे नाव आणि डोझ समजून घ्या.तुमच्या मुलाच्या इतर औषधांबरोबर संभाव्य औषधी प्रतिक्रिया समजण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या मुलाने घेतलेल्या सर्दी आणि खोकल्याच्या औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या लक्षणांची दखल ठेवा, जसे की असामान्य झोप, पोट फुगणे किंवा मूत्र अडथळा असेल तर तात्काळ बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ संदीप केळकर यांनी सांगितले.