मुंबई : आग्रीपाडा येथे शनिवारी रात्री एका कंपनीच्या जागेवरून झालेल्या वादातून मनी मॅग्नम कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी रायफलने गोळीबार करीत दगड, विटा फेकून काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मॅग्नम कंपनीचे अनेक कर्मचारी जखमी झाले. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी फ्रॅंको कंपनीतील ४१ जणांना अटक केली. त्यात २० महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार रायफली, मिरची स्प्रे, तसेच हल्ल्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

मुंबईतील आग्रीपाडा येथे मनी मॅग्नस या कंपनीच्या मालकी जागेवरून वाद आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. फ्रॅंको कंपनीचे मालक पास्कल पोस्टेल याने कंपनीच्या जागेवर कब्जा मिळवून एक प्रवेशद्वार बंद केले. प्रवेशद्वार क्रमांक १ येथे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले होते. प्रवेशद्वार क्रमांक २ येथे मॅग्नस कंपनीचे सुरक्षा रक्षक आहेत.

शनिवारी रात्री १० च्या सुमारास फ्रॅंको कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी अचानक मॅग्नस कंपनीचे सुरक्षा रक्षक आणि कर्मचार्यांवर मिरची पावडरच्या स्प्रेने फवारणी केली. यामुळे कर्मचार्याचे डोळे चुरचुरायला लागले. त्याच वेळेला फ्रॅंको कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी सशस्त्र हल्ला केला. रायफलने गोळीबार केला तसेच दगड, विटांचा मारा केला. काठ्यांनी मारहाण केली. गोळीबारात कुणी जखमी झाले नाही. मात्र हल्ल्यात मनी मॅग्नस कंपनीचे अनेक जण जखमी झाले. काही वेळात आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

मनी मॅग्नस कंपनीचा सुरक्षा रक्षक गणेश साळुंखे (४८) याने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम १८१ (१), १८९ (२), १८९, १८९ (४), १०९, १२६ (२), ११८ (१), १९१ (२), १९१ (३), ६१ (२) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम २५, २७, ३० अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एकूण ४१ जणांना अटक केली. त्यात २० महिलांचा समावेश आहे. फ्रॅंको कंपनीचा मालक पास्कल पोस्टेल यांच्यासह १५ जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाद काय आहे?

सातरस्ता येथील जेकब सर्कल जवळील जागा २००५ पासून मनी मॅग्नस नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची एव्हरेस्ट) कंपनीच्या नावावर आहे. फ्रॅंको इंडियन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने येथील काही जागेवर बेकायदेशीरपण अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मॅग्नम आणि फ्रॅंको कंपनीत वाद आहे. सध्या हे प्रकरण मुंबईच्या दिवाणी न्यायालयात आहे. न्यायालायाने या दाव्याचा निकाल देताना अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे सांगितले. त्यामुळे फ्रॅंको कंपनीविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र फ्रॅंको कंपनीने या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर या वादाला ‘स्टेटस को’ देण्यात आला आहे.