मुंबई: महापालिकेच्या घनकचरा वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अंधेरी पश्चिमेच्या वालावलकर चौकात बुधवारी दुपारी हा अपघात घडला. या अपघात प्रकरणी अंधेरी पोलिसांनी घनकचरा वाहनचालकाला अटक केली आहे.
अंधेरी पश्चिमेच्या वालावलकर चौकातील मस्जिद अल सलाम चौकात बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई महापालिकेचे घनकचरा वाहन (मिनी कॉपॅक्टर- एमएच ०२ ईआर ५३९०) भरधाव वेगाने जात होते. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून जाणाऱ्या दुचाकीला (ॲक्टीव्हा- एमएच ०२ बीएक्स ७१४०) जोरदार धडक दिली. त्या धडकेत दुचाकीस्वार अजीम शेख (३५) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.अझीम हा ब्लिंकीट कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो गोरेगाव येथे राहणारा होता.
पोलिसांनी घटनास्थळावरून घनकचरा वाहन चालक प्रकाश यादव (४०) याच्यावर मोटार वाहन अधिनिमय १९८८ च्या कलम १०६ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलल २८१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.