मुंबई: मोटारगाडीत ठेवलेली मालकाची ४५ लाख रुपयांची रोकड चालक आणि नोकराने पळवल्याची घटना आठ दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात घडली. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी बिहारमधून दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलिसांनी त्यांच्याकडून ३६ लाख रुपये हस्तगत केले.
वडाळा परिसरात वास्तव्यास असलेले तेजप्रकाश डांगी (५८) १९ सप्टेंबर रोजी मित्रांने दिलेले कामाचे ४५ लाख रुपये घरी घेऊन जात होते. मात्र त्यांची सून चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असल्याने ते तिला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. पैशांची बॅग गाडीत ठेऊन ते रुग्णालयात गेले होते. त्यावेळी गाडीत चालक नितेशकुमार महंतो होता. मात्र काही वेळानंतर पैशांची बॅग गाडीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी चालकाला फोन केला.
मात्र त्याचा फोन बंद होता. संशय आल्याने त्यांनी तत्काळ नितेशकुमारचा भाऊ राहुलकुमार महंतोला फोन केला. तो त्यांच्याच कार्यालयात काम करत होता. मात्र त्याचाही फोन बंद होता. दोघांचे फोन बंद असल्याने डांगी यांनी तत्काळ मोटारगाडीकडे धाव घेतली. मात्र चालक तेथेच गाडी सोडून पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाडीतील पैशांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. डांगी यांनी तत्काळ गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दोन्ही आरोपी मूळचे बिहारमधील एका खेड्यातील रहिवासी होते. त्यामुळे पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. सलग सहा दिवस शोध मोहीम राबवून पोलिसांनी आरोपींना समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावातून अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ३६ लाख रुपये हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.