मुंबई : काही दिवसांपूर्वी बेस्ट बस चालकाने अचानक वळण घेतल्याने दरवाज्यात उभा असलेला प्रवासी बसमधून खाली पडल्याची घटना चेंबूर परिसरात घडली होती. या अपघातात सदर प्रवासी गंभीर जखमी झाला होता. गेला महिनाभर रुग्णालयात उपचार घेऊन ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेले रमेश जाधव (४९) सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे जाधव चेंबूर – वडालादरम्यान बेस्ट बसने प्रवास करतात. नेहमीप्रमाणे ४ मार्च रोजी ते चेंबूर येथून वडाळा येथे बेस्ट बसने जात होते. यावेळी बेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे ते बसच्या दरवाजातच उभे होते. याच वेळी चेंबूरच्या उमरशी बाप्पा चौक परिसरात अचानक बेस्ट बस चालकाने जोरात वळण घेतले. त्यामुळे दरवाजात उभे असलेले जाधव यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातात त्यांच्या डोक्याला, पायाला, कंबरेला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात बसचालक महेश आवळे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.