मुंबई : एका प्रियकराने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीला औषधाच्या गोळ्या खायला घालून, तसेच तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा वायरने गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मालाडच्या मालवणी परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. यात सदर महिला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
पीडित महिला २३ वर्षांची असून तिला साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. ती पतीसोबत मिरा रोड येथे राहात होती. मात्र तिचे पतीसोबत पटत नव्हते. दरम्यान, ती प्रियंक उर्फ सिध्दार्थ पटेल (३९) याच्या संपर्कात आली. दोघांचे प्रेमसंबध जुळले. त्यानंतर ती मागील एक महिन्यापासून मालाडमधील गावदेवी मंदिर रस्त्यावरील जुलूसवाडी परिसरातील यादव चाळीत सिध्दार्थ पटेल सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. सिध्दार्थ पटेल हा खासगी कंपनीत नोकरीला होता.
पतीला भेटल्याचा राग
माझ्यासोबत रहायचे असेल तर पहिल्या पतीसोबत पूर्णपणे संबंध तोडावे लागतील, असे सिध्दार्थने पीडित महिलेला बजावले होते. मात्र तरीही ती पतीला भेटत होती. दोन दिवसांपूर्वी ती पतीला भेटण्यासाठी मिरा रोडला गेली होती. ही बाब सिध्दार्थला समजली आणि त्यावरून त्याने पीडित महिलेसबोत भांडण केले. त्याने पीडितेला मारहाण केली आणि घरातील क्रोसिनच्या गोळ्या तिला बळजबरीने खायला लावल्या. तसेच वायरने तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा गळा आवळला.
पोलीस पोहोचले आणि जीव वाचला
महिलेने त्या अवस्थेत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी १०० क्रमांवर संपर्क साधून मदत मागितली. शेजारीही मदतीला धावले. काही वेळातच पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी महिला आणि मुलाची सिध्दार्थच्या तावडीतून सुटका केली. या दोघांना कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
प्रियकराला अटक
कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले. आम्ही आरोपी सिध्दार्थ पटेल याला अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातून महिला घरी आल्यावर सविस्तर जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.