मुंबई : १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी ३५ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी पहाटे अटक केली. तरूणीने प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे महाविद्यालयातून परतत असताना आरोपीने तरूणीवर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गोरेगाव (पूर्व) येथील संतोष नगरमधील रहिवासी संजय प्रल्हाद बायस याला दिंडोशी पोलिसांनी मंगळवारी राहत्या घरातून अटक केली. तक्रारदार तरुणी कुलसुम शेख ही बायस यांच्या शेजारी राहते आणि वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. सोमवारी दुपारी शेख महाविद्यालयातून घरी परतत असताना पाठीमागून बायास आला, त्याने तिचे डोके धरले आणि पाठीमागून ब्लेडने वार केले. त्यात तिच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या. शेख यांच्या घराजवळ प्रकार घडला. त्यानंतर शेखने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर बायस घटनास्थळावरून पळून गेला.

हेही वाचा : खासगी बसचालकाला ‘ही’ एक चूक पडली महागात! प्रवाशाला द्यावी लागली दोन लाखांची नुकसानभरपाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिकांनी मुलीला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले आणि दिंडोशी पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलीची प्रकृती स्थिर झाल्यावर तिचा जबाब नोंदवण्यात आली. त्यानंतर आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्या जखमांवर चार टाके घालण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपी पीडित महाविद्यालयीन तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने तिला त्याबाबत विचारणाही केली होती. पण तिने त्याला नकार दिला होता आणि त्यानंतर त्याचे आणि तिच्या कुटुंबात भांडण झाले होते. त्यानंतर आरोपीने मुलीशी संपर्क साधला नाही. पण सोमवारी अचानक बायसने तिच्यावर हल्ला केला. आरोपीने दारूच्या नशेत तरूणीवर हल्ला केल्याचा संशय आहे. याबाबत दिंडोशी पोलीस अधिक तपास करीत आहेत.