मुंबई : शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. त्यामुळे आता या प्रकल्पातील रखडलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जोडरस्त्याच्या संरेखनात काहीसा बदल करत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावता येतो याची चाचपणी सध्या एमएमआरडीएकडून सुरु आहे.

मुंबई आणि नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएकडून शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू बांधण्यात आला आहे. हा सेतू जानेवारी पासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. असे असताना दक्षिण मुंबईतुन या सेतूवर अतिवेगाने जाण्यासाठी मात्र प्रवाशांना आजही प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण दक्षिण मुंबईवरून या सागरी सेतूवर पोहचणे सोपे व्हावे यासाठी बांधण्यात येत असलेल्या ४.५ किमीच्या शिवडी ते वरळी उन्नत रस्त्याचे काम अद्याप ही पूर्ण झालेले नाही. त्यासाठी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. कारण या प्रकल्पाचे आतापर्यंत केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम पूर्ण होण्यास डिसेंबर २०२५ उजाडण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकल्पात प्रभादेवी येथील पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नसल्याने प्रकल्पास विलंब होत आहे. त्यामुळे आता हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा : मुंबई: तीन संजय पाटील, दोन अरविंद सावंत निवडणूकीच्या मैदानात

उन्नत रस्ता प्रकल्पासाठी ८५० झोपडय़ांसह १९ इमारती बाधित होत आहेत. ८५० झोपडय़ा हटवल्या असल्या तरी प्रभादेवी येथील १९ इमारतींचे पुनर्वसन होणे बाकी आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्याच्या संरेखनात काही बदल करता येऊ शकतो का यावर अभ्यास सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. कमीत कमी इमारतींचे विस्थापन कसे होईल यादृष्टीने उन्नत रस्त्याचे संरेखन बदलण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल, काम वेग घेईल आणि डिसेंबर २०२५ अखेर प्रकल्प पूर्ण होईल असे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे.