मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला प्रवासी भाड्यांतील विविध सवलतीमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. आता अटल सेतूवरून धावणाऱ्या विद्युत शिवनेरीमुळे एसटीच्या तिजोरीत लाखोंची भर पडत आहे. अटल सेतूवरून ११ मे रोजीपासून दर अर्धा तासाने मुंबई – पुणे आणि पुणे – मुंबई ४३ फेऱ्या धावत आहेत. यातून १,१२५ प्रवाशांनी प्रवास केला असून एसटीला त्यातून ५ लाखांहून अधिक रुपये महसूल मिळाला आहे.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूवरील वाहनांची वारंवारता कमी झाल्याने, प्रवासी आणि पर्यटकांचा अटल सेतूला असणारा प्रतिसाद कमी झाल्याचे दिसून येते. जादा पथकर आकारणीमुळे अनेक वाहनचालक अटल सेतूवरून जाण्यास उत्साही नाहीत. याच वेळी अटल सेतूवरून धावणाऱ्या विद्युत शिवनेरीच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. यात महिला प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून प्रवाशांकडून अतिरिक्त शिवनेरी बस चालवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे अटल सेतूवरून धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या विद्युत शिवनेरी बसच्या फेऱ्यांमध्ये ११ मेपासून वाढ करण्यात आली. दादरवरून स्वारगेट/पुणे २० फेऱ्या आणि स्वारगेट/ पुण्यावरून दादरसाठी २३ फेऱ्या अशा एकूण ४३ फेऱ्या धावत आहेत. शनिवारपासून या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. ११ ते १३ मे या तीन दिवसांत अटल सेतूमार्गे विद्युत शिवनेरीमधून १,१२५ प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये ३८ टक्के महिला प्रवासी होत्या. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकही मुंबई पुणे, पुणे – मुंबई विद्युत शिवनेरीमधून प्रवास करीत आहेत. दादरवरून स्वारगेटला जाण्यासाठी २० फेऱ्या होत असून या बस फेऱ्यांनाही प्रचंड मागणी आहे. गेल्या तीन दिवसांत ५९२ प्रवाशांनी प्रवास केला. तर, स्वारगेट – दादर दरम्यानच्या प्रवासासाठी २३ फेऱ्या होत असून या बसमधून ५३३ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे सध्या मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी विद्युत शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा : मुंबई: मुलगा व सख्या भावावर काळाने घातली झडप

शिवनेरी ही प्रामुख्याने दादर-पुणे, स्वारगेट या मार्गावर धावते. दादर ते कळंबोलीपर्यंत अनेक प्रवासी शिवनेरी बस पकडतात. दादर, कुर्ला नेहरूनगर, मैत्री पार्क, मानखुर्द ,वाशी, सानपाडा, नेरुळ जंक्शन, खारघर, कळंबोली आणि पनवेल हे प्रमुख थांबे असून एकूण २२ शहर बस थांबे आहेत. मात्र, अटल सेतू मार्ग विद्युत शिवनेरी धावल्यास प्रवाशांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून, ४३ बस फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या बस फेऱ्यांना प्रवाशांची संख्या कमालीची आहे, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

११ ते १३ मेदरम्यान अटल सेतूमार्गे विद्युत शिवनेरीचा आढावा

विद्युत शिवनेरीमधील प्रवासी संख्या

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील प्रवासी – १७
६५ ते ७५ वर्षांदरम्यानचे ज्येष्ठ प्रवासी – ७२
महिला प्रवासी- ४२६
एकूण प्रवासी संख्या – १,१२५

विनासवलत उत्पन्न – ४,११,९०० रुपये

सवलत उत्पन्न – १,१८,८७५ रुपये

एकूण उत्पन्न – ५,३०,७७५ रुपये

हेही वाचा : घाटकोपरमधील तीन जाहिरात फलक हटविण्यासाठी एमएमआरडीएचा पालिकेला मदतीचा हात

दादरवरून स्वारगेट प्रवासी – ५९२

स्वारगेटवरून दादर प्रवासी – ५३३

१ एप्रिल ते ३० एप्रिल प्रवासी संख्या – १,९०० प्रवासी

एकूण उत्पन्न ९.४५ लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१ ते १० मे प्रवासी संख्या – ५८२ प्रवासी

एकूण उत्पन्न – ३.३५ लाख रुपये