मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या डिसेंबर २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या बृहतसूचीवरील २६५ घरांच्या सोडतीतील गैरप्रकारची चौकशी अखेर पूर्ण झाली. चौकशीचा अहवाल दुरुस्ती मंडळाकडून म्हाडा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून त्यानुसार ४९ विजेते अंतिमत: अपात्र ठरले आहेत. या विजेत्यांवर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा ठपका होता. चौकशीदरम्यान या विजेत्यांचे मूळ कागदपत्रे सादर न झाल्याने अखेर त्यांना अपात्र ठरवून त्यांचे घराचे वितरण म्हाडाने रद्द केले. या अपात्र रहिवाशांना म्हाडा उपाध्यक्षांकडे अपील करता येणार आहे.

गैरप्रकारची तक्रार दाखल

कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना दुरूस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते. कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतीचा पुनर्विकास झाल्यानंतर या रहिवाशांना हक्काची घरे वितरीत केली जातात. मात्र त्याचवेळी काही रहिवाशांच्या इमारतीचा विविध कारणांमुळे पुनर्विकास होत नाही आणि त्यांना संक्रमण शिबिरातच रहावे लागते. अशा रहिवाशांना हक्काची घरे देण्यासाठी दुरूस्ती मंडळाने बृहतसूची तयार केली आहे. मंडळाला पुनर्विकासाद्वारे उपलब्ध झालेली अतिरिक्त घरे या रहिवाशांना वितरीत केली जातात. त्यानुसार मागील आठवड्यात बृहतसूचीवरील पहिली संगणकीय सोडत पार पडली. बृहतसूचीवरील घरांच्या वितरणात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येत असल्याने आता ही सोडत संगणकीय करण्यात आली आहे. आता या सोडतीतही गैरप्रकार झाल्याचा आरोप करून यासंबंधीची तक्रार ट्रान्झिट कँम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी म्हाडा प्राधिकरणाकडे केली आहे.

कशी समिती स्थापन

बृहतसूचीवरील २६५ घरांसाठी डिसेंबर २०२३ मध्ये सोडत काढण्यात आली होती. मात्र या संगणकीय सोडतीत मोठा गैरप्रकार झाल्याचे सोडतीनंतर अवघ्या काही दिवसातच उघड झाले. सोडतीतील एका विजेत्यांने बनावट कागदपत्राद्वारे सहा अर्ज करून घर लाटल्याची तक्रार म्हाडा उपाध्यक्षांकडे ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी केली. चौकशीअंती यात तथ्य आढळले आणि संबंधित विजेत्याच्या घराचे वितरण रद्द करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर आणखी काही विजेत्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार पेठे यांनी म्हाडाकडे केली. या तक्रारीनंतर जानेवारी २०२४ मध्ये म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी एक चौकशी समिती स्थापन करून त्यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी सुरू झाली. मात्र चौकशी सुरू होऊन एक वर्ष उलटले तरी चौकशी अहवाल दुरुस्ती मंडळाकडून म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला जात नव्हता. तक्रारदाराच्या पाठपुराव्यानंतर अखेर नुकताच हा चौकशी अहवाल दुरुस्ती मंडळाने प्राधिकरणाकडे सादर केला आहे.

अपील करण्याची संधी

या चौकशी अहवालानुसार ५२ जण अपात्र ठरले आहेत. मात्र यापैकी एकाच्या नावात तफावत असल्याने त्याला एक संधी दिली जाणार आहे. आणखी दोघांच्या कागदपत्रांबाबतही काही त्रुटी असल्याने त्यांनाही संधी दिली जाणार आहे. तर उर्वरित ४९ विजेत्यांना अंतिमत: अपात्र ठरविण्यात आले आहे. तर चौकशी अहवालानंतर म्हाडा प्राधिकरणाने या ४९ जणांचे घराचे वितरण अखेर रद्द केल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी दिली. या ४९ विजेत्यांची घरांची वितरणे रद्द करण्यात आली असली तरी त्यांना एक शेवटची संधी म्हणून पात्रता सिद्ध करण्यासाठी म्हाडा उपाध्यक्षांकडे अपील करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फौजदारी गुन्हे दाखल करा

दीड वर्षात ४९ विजेते अधिकृत कागदपत्रे सादर करू शकलेले नाहीत. त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली होती हे त्यातूनच सिद्ध होते. त्यामुळे त्यांची घरे रद्द करण्याचा निर्णय स्वागातर्ह आहे. पण त्यांना अपील करण्याची संधी का देण्यात आली हा प्रश्न आहे. त्यांना अपील करण्याची संधी देण्याऐवजी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा. ४९ जणांसह सहा अर्ज करणाऱ्या विजेत्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा.

अभिजीत पेठे, तक्रारदार आणि अध्यक्ष, ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन