मुंबई : दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी लहानथोरांना आनंद देते, मात्र त्यातून निघणाऱ्या धूर आणि आवाजाने जिथे माणसांनाही असह्य त्रास होतो, तिथे प्राणी-पक्षी अपवाद कसे ठरतील? दिवाळीच्या चार दिवसांत मुंबई आणि परिसरात फटाक्यांच्या धुराचा त्रास झाल्याने, भाजल्याने ३१ प्राणी जखमी झाले आहेत. यामध्ये आठ श्वानांचा तर २३ पक्ष्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्राणी व पक्षी जखमी होण्याच्या घटनेत काही प्रमाणात घट झाली आहे.

३१ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात झाली. दिवाळीनिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. फुलबाजा, भुईचक्र, सुतळी बार, रॉकेट असे विविध प्रकारचे फटाके फोडताना झालेल्या वायू प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली. तसेच ध्वनी प्रदूषणाने अनेक नागरिकांना त्रास झाला आहे. या त्रासातून प्राणी आणि पक्षीसुद्धा सुटले नाहीत.

हेही वाचा…बेस्ट कर्मचाऱ्यांना अखेर बोनस! ‘लोकसत्ता’च्या बातमीनंतर ८० कोटी प्रशासनाच्या खात्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या चार दिवसांत मुंबईमध्ये ३१ प्राणी आणि पक्षी जखमी झाले आहेत. दिवाळीनिमित्त फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रचंड धूर निर्माण झाला. या धुरामुळे पक्ष्यांना श्वसनाचा त्रास होऊन त्यांना दुखापत झाली आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने जखमी झालेल्यांमध्ये १५ कबुतरे, सहा घारी आणि दोन घुबड यांचा समावेश आहे. तसेच आठ श्वान जखमी झाले असून यातील अनेक श्वानांना श्वसनाचा त्रास झाला, तर काही श्वानांच्या पाठीवर फटाके फोडण्यात आले. त्या श्वानांना भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व जखमी श्वान आणि पक्ष्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी झालेल्या पक्षी आणि श्वानांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती परळ येथील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अॅनिमल’ रुग्णालयाचे (बैलघोडा रुग्णालय) व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी दिली.