मुंबई : महानगरपालिकेने मुंबईतील विविध भागात नालेसफाई सुरू केली असली तरी नाल्यातून काढलेला गाळ अनेक ठिकाणी तसाच पडून असल्याच्या तक्रारी समाजमाध्यमवरून केल्या जात आहेत. गोवंडी – मानखुर्दमधील अनेक परिसरात छोट्या नाल्यातील गाळ काढण्याची कामे पालिका विभाग कार्यालयाने हाती घेतली आहेत. मात्र, दोन दिवस उलटल्यानंतरही नाल्याच्या कडेला काढून ठेवलेला गाळ उचलण्यासाठी पालिकेचे कर्मचारी येत नसल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. नालेसफाईत नियोजनाचा अभाव असल्यामुळे परिसर बकाल झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
नियमाला बगल…
पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी महानगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नालेसफाई करण्यात येते. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान काढला जातो. तसेच पावसाळ्यानंतर १० टक्के गाळ काढला जातो. मुंबईत पावसाळ्यात झोपडपट्टी परिसरात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते. नालेसफाईनंतरही अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे भूमिगत गटारे, मोठे नाले आदींसह छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्यावरही मोठा भर दिला जातो. मानखुर्द – गोवंडीतील अनेक भागांमध्ये पालिकेतर्फे नालेसफाई सुरू असून काही ठिकाणी नाल्यातील गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत. नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ ४८ तास त्याच ठिकाणी ठेवणे गरजेचे असते. मात्र, त्यानंतर त्याची तातडीने विल्हेवाट लावणे अपरिहार्य असते. असे असतानाही दोन दिवसांहून अधिक काळ उलटल्यांनंतरही अनेक ठिकाणी गाळ जैसे थे आहे. यावरून पालिकाच नियमाला बगल देत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
दुर्गंधी आणि अस्वच्छता…
महापालिकेने वेळीच गाळाची विल्हेवाट लावली नसल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. अनेकदा भटके श्वान तो गाळ उकरून टाकतात. त्यामुळे रस्त्यावर नाल्यातील गाळ विखुरला जाऊन परिसर बकाल होतो. ज्योतिर्लिंग नगर, बैंगणवाडी, कमला रमण नगर, सोनापूर आदी भागात नालेसफाईनंतर गाळ रस्त्यावरच पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या परिसरातील गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावावी. तसेच, परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.