मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी एका वृध्द महिलेच्या दोन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने लंपास केल्या. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. मालाडमध्ये राहणाऱ्या गोदावरी सिंग (७०) यांची अशाच प्रकारे दोन भामट्यांनी फसवणूक केली. त्या मंगळवारी सकाळी कांदिवली येथील न्यू लिंक रोडडवर गाईला चपाती देण्यासाठी गेल्या होत्या.

त्यावेळी मोटारसायकलवरून दोन इसम त्यांच्याकडे आले. आपण पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दोघांनी सिंग यांना बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखीने त्यांच्याकडील ३० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. या बांगड्यांची किंमत १ लाख ९५ हजार रुपये आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार चारकोप पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), २०४ अन्वये गुन्हा दाखल केला.

तोतया पोलिसांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

नागरिकांना फसविण्यासाठी ठकसेन विविध क्लुप्त्यांचा वापर करीत आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याची पध्दत जुनीच आहे. मात्र आजही ती तेवढीच परिणामकारक ठरत आहे. पोलिसांचे नाव घेतले की सर्वसामान्य माणूस बिचकतो आणि विश्वास ठेवतो. त्याचाच फायदा ठकसेन घेतात, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरी झाली आहे, दागिने काढून ठेवा. शेठला मुलगा झाल्याने तो साडी वाटतोय, तुमचे दागिने पाहिले तर तुम्हाला साडी मिळणार नाही, अशी थाप ते मारतात. ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या दागिन्यांची अदलाबदल करून ते त्यांची फसवणूक करतात. यामुळे तोतया पोलिसांपासून सावध रहावे. कुणी पोलीस असल्याचा दावा केला तर त्याचे ओळखपत्र पाहून खात्री करावी. कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.