मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असल्यामुळे सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये प्रभागांची रचना करून ती निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाने सर्व पालिकांना दिल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनही कामाला लागले आहे.
मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असून २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी असलेल्या प्रभाग रचोनुसारच प्रभागांच्या सीमा ठेवण्यात येणार आहेत. मात्र गेल्या आठ वर्षांत मुंबईत विविध विकासकामे झाली असून मेट्रोचे जाळे उभे राहिले आहे, सागरी किनारा मार्ग तयार झाला, अटल सेतू प्रकल्प पूर्ण झाला या सर्व विकास कामांचा समावेश या प्रभाग रचनेत करावा लागणार आहे. त्यादृष्टीने १९ जूनपासून स्थळ पाहणीला सुरूवात झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याकरीता नगर विकास विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार महानगरपालिकांमध्ये ८ सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या गृहीत धरण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत २२७ प्रभागांची संख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार आता मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे.
राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने प्रभाग रचनेच्या कामासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १९ ते २३ जून या कालावधीत प्रभागांच्या सीमांची स्थळ पाहणी होणार आहे. प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करण्यास गुरुवार, १० जूनपासून पालिकेच्या निवडणूक विभागाने सुरुवात केली आहे.
प्रभाग रचना २०१७ प्रमाणे असली तरी गेल्या आठ वर्षात मुंबईत अनेक नवीन विकासकामे झाली आहेत. या सर्व विकासकामांची दखल या नव्या प्रभाग रचनेत घ्यावी लागणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली. गेल्या काही वर्षात मेट्रोचे जाळे उभे राहिले आहेत, नवीन पूल तयार झाले आहेत. सागरी किनारा मार्ग, तसेच अटल सेतूसारखे मोठे प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे ही विकासकामे नक्की कोणत्या प्रभागात येतील त्याची नोंद करावी लागणार आहे. त्याकरीता स्थळ पाहणी केली जाणार आहे. त्याकरीता प्रत्येक प्रभागासाठी नेमलेले प्रगणक प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतील. यावेळी प्रगणकांना त्यांची ‘लाईव्ह लोकेशन’ देणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रभाग रचनेत या विकासकामाची नोंद केल्यामुळे पालिकेच्या नियमित कामातही त्याची मदत होणार आहे. प्रभाग निश्चित केल्यास हे प्रकल्प कोणत्या प्रभागात येतात ते निश्चित होईल. त्यानुसार सागरी किनारा मार्ग डी विभाग आणि जी दक्षिण विभागातून जातो. या प्रकल्पांच्या ठिकाणी उद्या काही घटना घडल्यास ती कोणत्या विभागाची जबाबदारी ते ठरवणे शक्य होणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पक्ष कार्यालयात निवडणूक कार्यालय
मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीतील तळ मजल्यावरील भाजप व शिवसेना पक्ष कार्यालयात मुंबई महापालिका प्रशासनाने निवडणूक कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयातील कामकाजाला बुधवारी सुरुवात झाली. पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत या कार्यालयातील कामाला सुरुवात करण्यात आली. या वेळी निवडणूक प्रभारी विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर पक्ष कार्यालयावरून वाद झाल्यापासून सर्व पक्ष कार्यालये बंद करण्यात आली होती. ती आता पुन्हा खुली करण्यात आली आहेत.