मुंबई : काही वर्षांपूर्वी गोविंदा, गणेशोत्सवातील गणेश आगमन – विसर्जन मिरवणुका असो की नवरात्रोत्सवातील गरबा कच्छी बाजाचा बोलबाला होता. कालौघात लेझीम, ढोल-ताशा, नाशिक बाजा आणि बेन्जो पथके वाढली आणि कच्छी बाजातील सनईचे सूर आणि ढोलाचा नाद हरवला. मिरवणूकांमध्ये पथकातील प्रसिद्ध वादकांचे वादन ऐकण्यासाठी मुद्दाम होणारी गर्दी आटली. कच्छी बाजामधील ढोल वादकाला साथ देणाऱ्या सनईवादकांची संख्याही तुरळक होत गेली. आता तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कच्छी बाजा पथके आहेत. कलेची ही परंपरा जपली जावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे, अशी साद जुन्या ज्येष्ठ वादकांनी घातली आहे.

सत्तरच्या दशकामध्ये मुंबईमध्ये कच्छी बाजाची संख्या प्रचंड होती. गणेशोत्सवातील तो अविभाज्य घटक होता. त्याकाळी उत्तम कच्छी बाजा पथकाला सुपारी देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चुरस लागत होती. या क्षेत्रात मुस्लीम वादकांचीच मक्तेदारी होती. शशी पोंक्षे या मराठी तरूणाने कच्छी बाजा पथक काढले. पथकाच्या ठेक्यावर रसिकांचे पाय थिरकू लागले. हळूहळू मुंबईसह महाराष्ट्रात ते लोकप्रिय झाले. ठिकठिकाणाहून त्यांना मागणी येऊ लागली. ‘त्याकाळी केवळ पैसेच नव्हे तर एक वेगळा मानही वादकांना मिळत होता. कालौघात रसिकांच्या आवडी निवडी बदलू लागल्या. मोठ्या आवाजातील वाद्ये, ध्वनीमुद्रीत गाणी यांना पसंती मिळू लागली आणि कच्छी बाजाचे दर्दी श्रोते कमी झाले’, अशी खंत पोंक्षे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : नैवेद्यासाठी मोदक, कंदी पेढा, बालुशाही अन् पेठाही; मुंबईकरांसाठी परगावातील व्यावसायिकांची धावपळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कालौघात बेन्जो पथके सुरू झाली आणि तुलनेत स्वस्तात मिळणाऱ्या बेन्जो पथकांना मागणी वाढत गेली. त्यापाठोपाठ नाशिक बाजाने गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये हजेरी लावली. त्याचा परिणाम कच्छी बाजावर झाला. आता कच्छी बाजासाठी पट्टीचे सनईवादकही फारसे मिळत नाहीत. सत्तर, ऐंशीच्या दशकात उत्सवात पथकातील वादकांचे सनईवादन ऐकण्यासाठी अगदी लांबून श्रोते येत असत. सनईच्या खणखणीत सूरांसह ढोल घुमायचे. ती मजात काही और होती. पण आता सन वादनाची रयाच गेली. ते सूरही हरवल्यासारखे वाटतात, असे पोंक्षे यांनी सांगितले. कच्छी बाजा ही एक कलाच आहे. ती जपण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे अन्यथा संस्कृती, वाद्यपरंपरेतील हा एक घटक लोप पावेल’, अशी भिती पोंक्षे यांनी व्यक्त केली.