मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघी मुंबापुरी सजली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये कमालीचा उत्साह आणि गणेशभक्तांची वर्दळ पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक व्यावसायिक मुंबईत दाखल झालेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाजवळच भाविकांना तयार गोडधोड नैवेद्य मिळावा यासाठी परगावातील व्यावसायिकांनी यंदाही धावपळ केली आहे. दरवर्षी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यामुळे विविध राज्यांतून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक गणेश दर्शनासाठी मुंबईत येतात. गणेशोत्सव काळात लालबाग, परळ परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या परिसराला जत्रेचे स्वरुप येते. ही संधी साधून राज्यभरातील अनेक छोटे - मोठे व्यावसायिक या भागात डेरेदाखल होतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाच्या आसपास उभारण्यात येणाऱ्या छोटेखानी स्टॉल्समध्ये साताऱ्यातील कंदी पेढे, धाराशिवचे निरनिराळे पेढे, तर आगऱ्यातील पेठा यासह निरनिराळ्या प्रकारची मिठाई भाविकांचे लक्ष वेधून घेत असते. हेही वाचा : गणपतीच्या मिरवणुकांमध्ये ‘जय श्रीराम’चा जयघोष‘रामजी की निकली सवारी’, ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ या गाण्यांना सर्वाधिक पसंती धाराशिवमधील पेढ्यांचे व्यावसायिक श्रीराम गवाणे गेली १५ वर्षे नित्यनियमाने गणेशोत्सवात पेढ्यांची विक्री करण्यासाठी लालबागमधील गणेशगल्लीत दाखल होतात. धाराशिवमध्ये त्यांच्या कारखान्यात पेढे तयार केले जातात. दरवर्षी त्यांच्या कारखान्यात तयार करण्यात आलेले ३०० किलो कंदी पेढे, ३०० किलो साखरेचे पेढे, प्रत्येकी ३० किलो चॉकलेट व केशरी मोदक विक्रीसाठी मुंबईत दाखल होतात. गणेशोत्सव केवळ निमित्त, मुंबईकरांना धाराशिवमधील पेढे चाखता यावे आणि व्यवसायाला गती मिळावी या उद्देशाने ते मुंबईत येतात. ‘पेढा हा निशिवंत पदार्थ आहे. मुसळधार पाऊस कोसळू लागताच गणेशभक्तांची वर्दळ कमी होते आणि मग तोटा सहन करावा लागतो. व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई आणि गणेश दर्शनाची संधीही मिळते , असे मत गवाणे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. हेही वाचा : गणेशोत्सवात चंद्रयान, शिवराज्याभिषेक सोहळा आणि राम मंदिराच्या प्रतिकृती ठाणे येथे राहणारे आनंद जैस्वाल गेल्या २० वर्षांपासून गणेशोत्सवात मिठाईचा व्यवसाय करण्यासाठी गणेशगल्लीत दाखल होतात. बालुशाही, खाजा, लाडू, मैसूर पाक, बुंदीचे लाडू अशा वेगवेगळ्या प्रकारची मिठाई ते नैवेद्यासाठी उपलब्ध करतात. ही सर्व मिठाई डोंबिवलीमधील कारखान्यात तयार करण्यात येते. इतकेच नव्हे तर आनंद जैस्वाल यांच्या स्टॉलवरील आगऱ्याचा पेठाही अनेकांचे लक्ष वेधून घेतो. खास गणेशोत्सवासाठी आगऱ्याहून पेठा आणण्यात येतो. हेही वाचा : अंडरवर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानातही बेटींग अॅप; पाकिस्तान पाठवलेल्या रकमेबाबत ईडीकडून तपास अशी असते दिनचर्या… लालबाग - परळ परिसरात पेढे व मिठाईचे स्टॉल्स २४ तास खुले असतात. सकाळ - सायंकाळ आणि सायंकाळ ते सकाळ अशा दोन पाळींमध्ये स्टॉल्सवर ३ - ३ कामगार काम करीत असतात. स्वतःचे काम संपल्यानंतर कामगार गणेश दर्शनासाठी, तसेच मुंबईतील पर्यटनस्थळी फिरायला जातात. मुंबई महानगरपालिकेच्या प्रसाधनगृहामध्ये हे कामगार अंघोळ करतात. स्टॉलजवळच चहा, नाश्ता व जेवण तयार करतात किंवा जवळच्या खाणावळीमध्ये भोजनाची व्यवस्था करतात.