मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातील ११ हजार १८७ घरांची विक्री ‘प्रथम प्रधान्य’ तत्वावर करण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत समाविष्ट असलेल्या २० टक्के योजनेतील घरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ६६१ पैकी ४५३ घरांसाठी २६०० हून अधिक अर्ज सादर झाले होते. त्यातील प्रथम अर्ज करणाऱ्या ४५३ अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यात आली असून शनिवारी या अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेसह पंतप्रधान आवास योजना आणि २० टक्के योजनेतील घरे विकली जात नसल्याने कोकण मंडळ अडचणीत आले आहे. मंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी धोरणात्मक निर्णय घेत ‘पीएमएवाय’ आणि २० टक्के योजनेतील शिल्लक घरांची विक्री ‘प्रथम प्राधान्य’ तत्वाने करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ११ हजार १८७ घरांची ‘प्रथम प्राधान्य’ तत्वाने विक्री करण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी मंडळाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. तर ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. या ११ हजार १८७ घरांमध्ये सर्वाधिक नऊ हजार ८८३ घरे ही ‘पीएमएवाय’मधील असून ६६१ घरे २० टक्के योजनेतील आहेत. तर ५१२ सदनिका एकात्मिक आणि १३१ घरे विखुरलेली आहेत. या घरांसाठी अर्ज विक्री-स्वीकृती सुरू होऊन आठवडा झाला असून या ‘पीएमएवाय’ योजनेतील घरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्याचवेळी २० टक्के योजनेतील घरांना मात्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ६६१ घरांपैकी ४५३ घरांसाठी २६०० हून अधिक अर्ज सादर झाल्याची माहिती कोकण मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी त्यास दुजोरा दिला. २६०० अर्जांची छाननी करून पात्र ४५३ अर्जदारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. प्रथम अर्ज करणारे हे पात्र अर्जदार आहे. आता या अर्जदारांच्या नावाची यादी शनिवारी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणर आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून घरांचे वितरण करण्यात येणार आहे.

हे ही वाचा…मुंबईत वाढत्या घरभाड्यांमुळे ‘ब्रेन-ड्रेन’ होतंय, लोक कमावतायत कमी आणि भाडी भरतायत जास्त!

‘प्रथम प्राधान्य’मधील ‘पीएमएवाय’ घरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याने कोकण मंडळाची चिंता वाढली आहे. ‘पीएमएवाय’मधील घरांची संख्याही सर्वाधिक आहे. ही घरे विकणे कोकण मंडळासाठी गरजेचे आहे. त्यामुळे आता ही घरे विकण्यासाठी जाहिरातीवर भर देण्याचा विचार कोकण मंडळ करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा…पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अखेर ‘नाना’ला २६ वर्षांनंतर अटक

कोकण मंडळाच्या १,३२२ घरांसह ११७ भूखंडांच्या सोडतीलाही प्रतिसाद नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण मंडळाकडून कोकणातील एक हजार ३२२ घरांसह ११७ भूखंडांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेलाही ११ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. ११ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) एक हजार ३२२ घरांसह ११७ भूखंडांसाठी केवळ एक हजार ३०१ अर्ज सादर झाले आहेत. यापैकी केवळ ४२४ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. प्रतिसाद कमी असला तरी अर्ज विक्री-स्वीकृतीसाठी बराच कालावधी शिल्लक आहे. त्यात लवकरच दिवाळी येत आहे. या काळात इच्छुकांचा प्रतिसाद वाढेल, असा विश्वास कोकण मंडळाला आहे.