मुंबईः घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्याच आईच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचा गंभीर प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. जखमी महिलेला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पंधरा वर्षांच्या आरोपी मुलाला ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालनिरीक्षणगृहात पाठविण्यात आले आहे. जखमी महिला बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तिच्याकडून घटनेची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

चुन्नाभट्टी येथील चाफेगल्ली, स्वदेशी मिल रोड परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. याप्रकरणी महिला पोलिसांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला पोलीस शिपाई सुप्रिया बाळासाहेब जाधव या चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी सकाळी सव्वाअकरा वाजता त्या चुन्नाभट्टी येथील चाफेगल्ली परिसरात बंदोबस्तावर होत्या. याच दरम्यान तिथे एक व्यक्ती आला आणि त्याने परिसरातील एका महिलेवर तिच्याच अल्पवयीन मुलाने तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार केले असून ती गंभीर जखमी झाली आहे. तिला मदतीची गरज आहे, असे सांगितले. त्यामुळे सुप्रिया जाधव यांनी ही माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देऊन घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्वदेशी मिल रोड येथील घरात सदर महिला गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर चाकूने वार केल्याच्या गंभीर जखमी होत्या. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून महिलेला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात नेले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमी महिलेची स्थिती गंभीर आहे. तिच्या गळ्यावरच वार झाल्याने ती बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. मात्र तिने इशार्‍याने हा हल्ला तिच्या मुलाने केल्याचे सांगितले. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या रागातून त्याने त्याच्या आईच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तेथून पलायन केले होते. तपासात हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. अखेर तो सापडताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो १५ वर्षांचा असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालनिरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.