मुंबई : मुंबईतील १२ हजार घरांची एप्रिलमध्ये विक्री झाली असून या घरविक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला ९८६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये घरविक्रीत काहीशी घट झाली आहे. मात्र असे असले तरी एप्रिलमधील घरविक्री समाधानकारक मानली जात आहे. रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्यानंतरही मुंबईतील घरविक्रीत मोठी घट झालेली नाही. त्यामुळे एप्रिलमधील घरविक्री समाधानकारक असल्याचे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मुंबईमधील १५ हजारांहून अधिक घरे मार्चमध्ये विकली गेली होती आणि यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये विक्री झालेल्या घरांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. मात्र घरविक्री स्थिर आहे. दरवर्षी मार्चमध्ये घरविक्रीत मोठी वाढ होते. आर्थिक वर्ष संपुष्टात येत असल्याने आणि रेडीरेकनरच्या दरात वाढ होत असल्याने मार्चमध्ये दस्तनोंदणी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तर एप्रिलमध्ये रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम घरविक्रीवर दिसून येतो. पण यंदा एप्रिलमध्ये घरविक्रीत मोठी घट झालेली नाही.

एप्रिल २०२४ मध्ये ११ हजार ६४८ घरांची विक्री झाली आणि राज्य सरकारला त्यातून १०५७ कोटी रुपये महसूल मिळाला होता. तर एप्रिल २०२३ मध्ये १० हजार ५१३ घरांची विक्री झाली होती आणि यातून ८९९ कोटी रुपये महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाला होता. या दोन्ही वर्षांची तुलना करता एप्रिल २०२५ मधील घरविक्रीत मोठी वाढ दिसून येत आहे. यंदा एप्रिलमधील घरविक्रीने १२ हजाराचा टप्पा पार केला आहे. तर मागील पाच वर्षांतील एप्रिलमधील ही सर्वाधिक घरविक्री आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २०२५-२६ वर्षासाठी रेडीरेकनरच्या दरात ३.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील काही वर्षात रेडीरेकनरमध्ये वाढ झाली नव्हती. रेडीरेकनरमध्ये वाढ झाली असली तरी दुसरकीकडे मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात घट केली आहे. त्यामुळे गृहकर्जाच्या व्याजदरात काहीशी घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. एकूणच या सर्व बाबींचा विचार करता एप्रिलमध्ये घरविक्री स्थिर राहिल्याचे चित्र आहे. तर अक्षयतृतीयाचा मुहूर्त लक्षात घेता रात्री उशिरापर्यंत विक्री झालेल्या घरांची संख्या १३ हजाराचा टप्पा पार करेल, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.