मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अॅम्फेटामाईन आणि एक्स्टसी या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी २३ वर्षीय नायजेरियन महिलेला अटक केली. ब्लेसिंग फेवर ओबोह असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ७ कोटी रुपये आहे.
एक परदेशी महिला दिल्लीहून मुंबईकडे बसने प्रवास करीत असून तिच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात अॅम्फेटामाईन असल्याची माहिती डीआरआय मुंबईला मिळाली. या माहितीच्या आधारे वांद्रे येथील काळानगर बस थांब्यावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला ताब्यात घेतले. तिच्या ट्रॉली बॅगची झडती घेतली असता त्यात दोन किलो ५६३ ग्रॅम अॅम्फेटामाईन आणि ५८४ ग्रॅम एक्स्टसी या अमली पदार्थांच्या गोळ्या सापडल्या. अॅम्फेटामाईन आणि एक्स्टसी कायद्यानुसार प्रतिबंधित आहेत.
याप्रकरणी तात्काळ तिला डीआरआयच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने पैशांसाठी तस्करी केल्याचे मान्य केले. डीआरआयने केलेल्या चौकशीत मुख्य आरोपीकडून आपल्याला मोठी रक्कम मिळणार होती, असे तिने कबुल केले. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. आरोपी महिलेने ट्रॉली बॅगमध्ये अत्यंत कुशलतेने अमली पदार्थ लपवले होते. तपास यंत्रणांपासून लपवून अमली पदार्थ भारतात आणण्याचा तिने प्रयत्न केला होता.
या प्रकरणामध्ये एक मोठे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असून आरोपी महिलेच्या चौकशीत आणखी एका व्यक्तीचा सहभाग उघड झाला आहे. त्या व्यक्तीची ओळख पटली असून सध्या शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी तपास प्राथमिक स्तरावर आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि साथीदारांची ओळख पटवण्याचे व अटक करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डीआरआयच्या सूत्रांनी दिली. त्यातील काही आरोपी परदेशातही आहेत, असा संशय आहे.
पार्टी ड्रग्स
यापूर्वी एक्स्टसी तस्करीप्रकरणी डीआरआयने बोरिवली परिसरातून एका तरूणाला अटक केली होती. बेल्जियम येथून आंतरराष्ट्रीय टपालाद्वारे संशयीत वस्तू आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने फेब्रुवारी महिन्यात एका पार्सलची तपासणी केली. त्यावेळी त्यात ९७५ ग्रॅम एमडीएमए अमली पदार्थ सापडले होते. अॅम्फेटामाईन आणि एक्स्टसी हे पार्टी ड्रग्स म्हणून प्रसिद्ध आहेत. परदेशात त्याला मोठी मागणी आहे. सद्या भारतातही या अमलीपदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे.