मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली संदेश पाठवून एका पोलीस शिपायाची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी तक्रारदार पोलिसाचा विश्वास संपादन करण्यासाठी बँकेच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार केले होते. याप्रकरणी बुधवारी जुहू पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पारपत्र निलंबनामुळे भारतात परतू शकत नाही, मेहूल चोक्सीचा विशेष न्यायालयात दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार पोलीस शिपाई वांद्रे पोलीस वसाहतीत राहत असून ते मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. १ मार्च २०२३ रोजी ते विलेपार्ले येथील जुहू-तारा रोडवर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने संदेश पाठविला होता. त्यात त्यांची नेट बँकिंग सेवा आज बंद होणार आहे. तुमचे पॅनकार्ड अपडेट झाले नसून ते तातडीने अपडेट करावे असे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी संदेशमधील लिंक उघडली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँकेचे संकेतस्थळ उघडले. ते बँकेचे अधिकृत संकेस्थळ असल्याचे समजून त्यांनी त्यांची माहिती अपलोड केली. ही माहिती दिल्यानंतर काही वेळेत त्यांच्या बँक खात्यातून ३६ हजार ८४० रुपयांचा व्यवहार झाला. केवायसी अपडेटच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रार अर्जावरुन बुधवारी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.