मुंबई : चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या माकडाच्या पिल्लाला पशुवैद्यकांनी दुर्मिळ शस्त्रक्रियेद्वारे जीवनदान दिले आहे. पिल्लाच्या डोळा आणि चेहऱ्यावर खोलवर जखमा झाल्या होत्या. त्या जखमांमध्ये किडे झाले होते. इतकेच नाही तर पिल्लू जे अन्न खात होते ते देखील जखमेतून बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर पिल्लांच्या तब्येतीत सुधारणा होत असून ते सुखरुप आहे.
चेंबूरमधील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बी.आर.सी) परिसरातून काही दिवसांपूर्वी माकडाच्या जखमी पिल्लाला रेस्क्यूइंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ (रॉ) या संस्थेच्या सदस्याने ताब्यात घेऊन त्याला पशुवैद्यक डॉ. दीपा कट्याल यांच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. दरम्यान, पिल्लाच्या जखमांवर पडलेल्या किड्यांनी त्याच्या संपूर्ण चेहऱ्याचे नुकसान केले होते. एका बाजूचा चेहरा संपूर्ण खराब झाला होता. याचबरोबर एका डोळ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. चेहऱ्यावर झालेल्या जखमेमुळे तो जे अन्न खात होता ते शरीरात जाण्याएेवजी जखमेवाटे पुन्हा बाहेर येत होते. कारण जखमेमुळे त्याच्या तोंडाला छिद्र पडले होते. माकडाचे पिल्लू साधारण दिड महिन्याचे असल्याने तसेच त्याचे वजन केवळ ३५० ग्रॅमच असल्यामुळे त्याच्या शरीरात अन्न जाणे आवश्यक होते. यासाठी त्याच्या शरीरात नळी टाकण्यात आली आणि त्या नळीवाटे त्याला अन्न देण्यास सुरुवात केली. पिल्लू जखमांमुळे त्रासलेले आणि आक्रमक असल्याने त्याने नळी खेचून काढली. त्यानंतर पुन्हा नवीन नळी टाकण्यात आली. आता माकडाचे पिल्लू व्यवस्थित अन्न घेत असून त्याचे वजन ५० ग्रॅमने वाढले आहे.
जखम होण्याचे कारण काय
माकडाचे पिल्लू अगदीच लहान आहे. वावरताना काहीतरी लागल्यामुळे झालेली जखमही असून शकते. किंवा कोणीतरी हल्लादेखील केलेला असू शकतो. जखम कशामुळे नेमकी झाली हे ठामपणे सांगता येत नाही. दरम्यान, तो कळपातून विभक्त असल्याचेदेखील सांगितले जात आहे. जखम झाल्यामुळे किंवा तो आक्रमक आहे यामुळे तो विभक्त असावा. परिणामी हे पिल्लू एकटेच फिरत असायचे.
कळपापासून विभक्त होण्याचे परिणाम
- पिल्लाचे मुख्य अन्न म्हणजे आईचे दूध, आईपासून वेगळं झाल्यास पुपोषण, वजन घटणे तसेच रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
- एखादा आजार पटकन होऊ शकतो.
- असुरक्षिततेची भावना, तसेच त्यांचे सामाजिक वर्तन बिघडते.
पिल्लाला उपचरासाठी आणले तेव्हा ते फारच अशक्त होते. त्याच्या जगण्याची शक्यता फारच कमी होती, परंतु आमचे प्रयत्न सतत सुरु होते. त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पिल्लाचे वजन वाढले आहे. ते व्यवस्थित खाऊ लागले आहे. मात्र, त्याला पूर्ण बरे होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. – डॉ. दीपा कट्याल, पशुवैद्यक