मुंबई : नवीन दवाखाना सुरू करणाऱ्या एका महिला डॉक्टरकडे कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १० हजार रुपये खंडणी मागितल्याचे उघडकीस आले. कामगार संघटनेच्या नावाने पैसे न दिल्यास दवाखान्याचे काम बंद पाडू आणि हल्ला करून तोडफोड करू, अशी धमकीही महिला डॉक्टरला देण्यात आली. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांदिवली येथे वास्तव्यास असलेल्या महिला डॉक्टरचा बोरिवली येथे दवाखाना आहे. त्यांना नवीन दवाखाना सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी बोरिवली पश्चिमेच्या शिंपोली येथील ग्रीन वुडस इमारतीत जागा विकत घेतली. या दवाखान्यात फर्निचरचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास एक अनोळखी इसम तेथे आला आणि त्यांनी तेथील कामगारांना धमकावून काम बंद पाडले. येथे काम कायचे असेल, तर माथाडी कामगार संघटनेच्या नावाने १० हजार रुपयांची पावती फाडावी लागेल, अशी धमकी त्यांनी दिली. त्यांनतर विवेक जाधव नावाच्या एका व्यक्तीने फिर्यादी डॉक्टरांना फोन केला. कामगार संघटनेच्या नावाने पावती फाडली नाही, तर काम बंद पाडू, तोडफोड करू, अशी धमकी त्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटना घडली तेव्हा मी तेथे नव्हते. त्यामुळे मी त्यांना ओळखत नाही. ही जागा आमच्या स्वत:च्या मालकिची आहे. पहिल्यांदाच हा प्रकार घडला. याप्रकरणी आम्ही बोरिवली पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार केल्याचे फिर्यादी डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३०८ (४), ३३३, ३५२, ३५१ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.