मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ वरून पुढे वांद्रयाच्या दिशेने जाणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) टर्मिनल १ जवळ एक उड्डाणपूल बांधला आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले असून ७९० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे शनिवारी, ९ मार्चला रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असून हा पूल सुरु झाल्यास आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वांद्रे प्रवास वेगवान होणार आहे. तसेच या पुलामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. अशावेळी टर्मिनल २ वरून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होते. याचा फटका वांद्रे आणि अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बसतो. ही बाब लक्षात घेता टर्मिनल २ वरून वांद्र्याला जाणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने टर्मिनल १ जवळ, पश्चिम द्रुतगती महामार्गावर ७९० मीटर लांबीचा आणि ८ मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ४८.४३ कोटी रुपये खर्चाच्या या पुलाचे काम मे. आर. पी. एस. इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याबाबत अनिश्चितता; विविध प्रकल्पांचे उद्धाटनभूमिपूजन ऑनलाइन?

टर्मिनल १ जवळील या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे लोकार्पण करत हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार शनिवार, ९ मार्च रोजी रात्री 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल विमानतळ येथे हा लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.