मुंबई : पवईत राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पवई पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली. सावित्रीदेवी चंद्रभान असे या महिलेचे नाव असून ती पतीसोबत राहात नव्हती. पुन्हा एकत्र राहण्यासाठी पती तिचे मन वळवत होता. मात्र तिने नकार दिल्याने रविवारी संतापलेल्या पतीने उशीने तोंड दाबून तिची हत्या केली.
सावित्री देवी चंद्रभान (५६) ही महिला वकील आहे. ती पवईच्या रहेजा संकुल परिसरात एकटी रहात होती. ती रविवारी दुपारी आपल्या घरात बेशुद्धावस्थेत आढळली. स्थानिक रहिवाशांनी या संदर्भात मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालायत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. श्वास गुदरमल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यामागे घातपाताचा संशय पोलिसाांना आला आणि त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला.
संशीयत पतीला अटक
हत्या झाली तेव्हा सावित्री घरात एकटी होती. ती पतीपासून वेगळी रहात होती. पोलिसांनी तिचा पती राजीवकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. राजीव चंद्रभानविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
एकत्र राहण्यास दिला नकार
सावित्री देवी चंद्रभान पतीसोबत पवईच्या रहेजा विहार परिसरात रहात होती. तिचा पती राजीव दोन वर्षापूर्वी खासगी विमान कंपनीतून निवृत्त झाला होता. त्यांच्यात पूर्वीपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळे मागील एक वर्षांपासून ते वेगळे राहू लागले होते. राजीव मरोळ येथे, तर सावित्री पवईला रहात होती. दरम्यान, राजीवने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि तो सावित्रीचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होता. तो रविवारी दुपारी सावित्रीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. यावेळी त्याने पुन्हा सावित्रीला एकत्र राहण्याबाबत विचारले. मात्र सावित्रीने नकार दिला. या मुद्द्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात राजीवने उशीने तिचे तोंड दाबले. श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला. आरोपी राजीवला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पवई पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.